चंद्रकांतदादांचा 'घरचा मतदारसंघ' शिवसेनेला सोडावा लागणार?

मंत्री पाटील-आमदार आबिटकर यांच्यात गेली साडेचार वर्षे टोकाचा संघर्ष झाला आहे.
चंद्रकांतदादांचा 'घरचा मतदारसंघ' शिवसेनेला सोडावा लागणार?

कोल्हापूर : कॉंग्रेस पक्षातून भाजपात दाखल झालेले व भाजपकडून राधानगरी-भुदरगड विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केलेले राहूल देसाई यांची भाजप-शिवसेना युतीमुळे चांगलीच पंचाईत झाली आहे. 

या मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेनेकडून निवडून आले आहेत. आबिटकर यांना रोखण्यासाठीच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देसाई यांना भाजपात घेतले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत देसाई यांच्या उमेदवारीचा बारही भरला.

आता युती झाली असलीतरी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येईल, असा देसाईंना विश्वास आहे.

चंद्रकांतदादा व राधानगरी भुदरगडचे आमदार आबिटकर यांच्यात अजिबात सख्य नाही. स्थानिक विकास कामांचा श्रेयवादही या मतदार संघात चांगलाच रंगला. यानंतर मंत्री पाटील यांनी माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र राहूल देसाई यांनाच थेट भाजपात घेत आबिटकर यांना शह देण्याचा प्रयत्न केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गारगोटी येथे मेळावा घेवून देसाई यांच्या उमेदवारीचा बार भरण्यात आला. मंत्री पाटील यांनी ठिकठिकाणी कार्यक्रमात राहूल देसाई यांची उमेदवारी पुढे रेटत नेली. त्यामुळेही आ.आबिटकर-मंत्री पाटील यांच्यातील दरी वाढत गेली. महिन्याभरापूर्वी मंत्री पाटील यांनी या मतदार संघात चक्‍क 550 कोटींच्या कामाचे लोकार्पण व शुभारंभ केला. स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही या कार्यक्रमास न बोलावल्याने आमदार आबिटकर चांगलेच दुखावले. त्यांनी मंत्री पाटील यांच्याविरोधात हक्‍कभंग आणणार असल्याची घोषणाच केली. एकूणच मंत्री पाटील-आमदार आबिटकर यांच्यात गेली साडेचार वर्षे टोकाचा संघर्ष झाला आहे. मात्र आता युती झाल्यानंतर मतदार संघातील राजकीय गणितच बदलून जाणार आहे. देसाईंना मात्र मतदारसंघ आपणाला मिळेल, अशी खात्री आहे. 

भारतीय जनता पार्टीने या मतदार संघात खूप काम केले आहे. अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावलेले आहेत. त्याचबरोबर भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा हा घरचा मतदार संघ आहे. राज्यातील अनेक मतदार संघाची अदलाबदल सुरु आहे. त्यामुळे हा मतदार संघ मंत्री पाटील हे भाजपसाठी घेतील, याची मला खात्री असल्याने मी निवडणूक लढणारच. -राहूल देसाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com