raghunathdada patil criticise shetty and khot | Sarkarnama

वारणानगर येथील ऊस परिषद मुख्यमंत्र्यांची, जयसिंगपूरमधील जयंत पाटलांची!

सुनील पाटील
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

दोन्ही ऊस परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्याहितापेक्षा आप-आपली पदे टिकाविण्याची धडपड केली जात आहे.

कोल्हापूर: कृषी व पणनराज्यमंत्री सदाभाऊ खोत वारणानगर येथे घेत असलेली ऊस परिषद ही मुख्यमंत्र्यांची आणि तर खासदार राजू शेट्टी जयसिंगपूर येथे घेत असलेली ऊस परिषद राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची आहे. या ऊस परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही होणार नाही, अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी आज केली.

येथील राजर्षि शाहू स्मारक भवन येथे रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ते बोलत होते. 

रघुनाथदाद पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात अनेक शेतकरी संघटना आहेत. सध्या काही नवीन संघटनाही उदयास आलेल्या आहेत. ज्या संघटना एफआरपीची रक्कम तीन हप्त्यात दिली तरी चालेली म्हणून सांगताहेत. अशा संघटनांना शासन आणि साखर कारखान्यांकडून मलिदा मिळतो. त्यामुळेच त्या संघटना शेतकऱ्यांच्या हिताविरूध्द काम करत आहेत.
 
मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत संघटनेच्यावतीने बुधवारी (ता. 24) वारणानगर येथे घेतली जाणारी ऊस परिषद ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आयोजित केली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जयसिंगपूर येथे शनिवारी (ता. 27) घेतली जाणारी ऊस परिषद ही राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंतराव पाटील यांची आहे. या दोन्ही ऊस परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्याहितापेक्षा आप-आपली पदे टिकाविण्याची धडपड केली जात आहे. हे शेतकऱ्यांसाठी दुदैवी आहे.

गेल्यावर्षी सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने एफआरपी अधिक 200 रुपये असा तोडगा काढला होता. मात्र कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात एफआरपीही दिलेली नाही. त्यामुळे स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे आता कुठे आहेत, असाही श्री पाटील यांनी सवाल केला. 

संबंधित लेख