कठिण प्रसंगांतून राधाकृष्ण विखे पाटलांनी मारली बाजी

राजकारणाचा आपल्या आजोबापासूनचा वारसा जपत राजकारणाचे सूत्र आपल्या हाती ठेवण्यात विखे कुटुंबिय कायमच यशस्वी झाले आहे. मागील वर्षभरातील अत्यंत वेगवान घडामोडीत न डगमगता ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील अखेर भाजपमध्ये नव्याने प्रवेश करून थेट कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झाले.
कठिण प्रसंगांतून राधाकृष्ण विखे पाटलांनी मारली बाजी

नगर : राजकारणाचा आपल्या आजोबापासूनचा वारसा जपत राजकारणाचे सूत्र आपल्या हाती ठेवण्यात विखे कुटुंबिय कायमच यशस्वी झाले आहे. मागील वर्षभरातील अत्यंत वेगवान घडामोडीत न डगमगता ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील अखेर भाजपमध्ये नव्याने प्रवेश करून थेट कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झाले. 

काळ, वेळ यांचा मेळ घालत अचूक निर्णयक्षमता हेच त्यांच्या राजकीय प्रवासातील मानबिंदू म्हणावा लागेल. आज विखे कुटुंबियांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा क्षण. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबई येथे त्यांना पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी पेढे भरवून आनंद व्यक्त केला.

राजकारणाचा भक्कम वारसा
राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारताना सहकाराची बिजे रोवली. ही बिजे वाढविण्याचे आणि फुलविण्याचे काम त्यांचे चिरंजीव स्वर्गिय बाळासाहेब विखे पाटील यांनी केले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारणात आपले स्थान अधिक बळकट केले आहे. 

बालपणापासून घरातून मिळालेले संस्कार, चळवळींची संघर्षमय वाटचाल आणि राजकारणाचे बाळकडू राधाकृष्ण विखे पाटलांना लहानपणापासूनच मिळाले. इयत्ता सातवीत असतानाच भारत-पाकिस्तान युद्धाचे रोमांचकारी वर्णन रेडिओवर एकताना ते शौर्याने भारावून गेले. त्यानंतर बांगलादेशी निर्वासितांच्या मदतीसाठी आपल्या मित्रपरिवारांकरवी कपडे पाठविले. 

धुळे, कोल्हापूर येथे कृषि महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांनी सामाजिक काम सुरू केले. कोल्हापुरच्या कृषि महाविद्यालयातील अपुऱ्या सुविधांबाबत त्यांनी संप घडवून आणला होता. 

१९८० मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या श्रीरामपूर येथील जाहीर सभेच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्या वेळी स्वयंसेवक म्हणून काम करताना पोलिसांच्या लाठ्याही खाण्याची वेळ आली होती.

१९८६-८७ मध्ये युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद भूषविताना त्यांनी युवकांसाठी मोठी कामे केली. 

१९९४ साली शिर्डी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळविला. त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुका त्यांनी जिंकल्या. 

दरम्यानच्या काळात कृषीमंत्रीपद मिळून कृषी अभ्यासात स्त्रियांचा सहभाग वाढविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्याचे पहिले कृषी धोरण मांडण्याचा व त्याद्वारे कृषी विस्तार, मृदुसंधारण व फलोत्पादनावर भेर देत एक खिडकी योजना राबविण्याचा मान विखे यांना मिळाला.
 
कठिण प्रसंगातून मारली बाजी
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील कॉंग्रेसमध्ये होते. आपल्या मुलासाठी कॉंग्रेसकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा कॉंग्रेसला मिळावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तथापि, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते मान्य न केल्याने मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून खासदारकी मिळविली. या घडामोडीत राधाकृष्ण विखे कॉंग्रेसमध्येच होते. 

तथापि, मुलाच्या विजयासाठी त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून कॅबिनेटमंत्रीपद मिळविले. अशा कठिण प्रसंगातून त्यांनी मारलेली बाजी महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या नकाशावर चर्चेची ठरली.

राजकीय घटनाक्रम 
- मार्च १९९५ पासून विधानसभा सदस्य
- १९९७ ते १९९९ - कृषी, जलसंधारण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन मत्स्यव्यवसायमंत्री.
- फेब्रुवारी २००९ - शालेय शिक्षण, विधी व न्याय मंत्री, पालकमंत्री औरंगाबाद
- नोव्हेंबर २००९ - परिवहन, बंदरे, विधी व न्यायमंत्री
- २०१० - कृषी व पणनमंत्री, पालकमंत्री अमरावती.
- २०१४ - कॉंग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी निवड
- २४ डिसेंबर २०१४ ते ४ जून २०१९ - महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेतेपद.
- १६ जून २०१९ - कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com