Radhakrishna Vikhe Patil asks tough questions to Government | Sarkarnama

विखेंचा सवाल : राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा? 

संजय मिस्कीन 
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा? हा अहवाल अद्याप सार्वजनिक झालेला नसताना आणि त्यातील शिफारशींची अधिकृत माहिती नसताना मुख्यमंत्री त्याआधारे घोषणा करतात कसे?

-राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : "मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला कसा? हा अहवाल अद्याप सार्वजनिक झालेला नसताना आणि त्यातील शिफारशींची अधिकृत माहिती नसताना मुख्यमंत्री त्याआधारे घोषणा करतात कसे? आयोगाचे सदस्य प्रसारमाध्यमांपुढे जाऊन भाष्य करतात कसे?" असे अनेक सवाल उपस्थित करून यासंदर्भात हक्कभंग आणण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला आहे.

विखे-पाटील यांनी आज येथील आझाद मैदानावर मागील दोन आठवड्यांपासून उपोषणावर असलेले मराठा क्रांती मोर्चाचे प्रा. संभाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली व त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. विखे-पाटील म्हणाले की," मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अजून विधिमंडळाच्या पटलावर सादर झालेला नाही. तो अहवाल सरकारने स्वीकारलेला नाही. त्यात नेमक्‍या काय शिफारशी आहेत, ते अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. या परिस्थितीत मराठा समाजाने 1 डिसेंबरला जल्लोष करावा, असे मुख्यमंत्री कशाच्या आधारावर सांगतात?" अशी टीका विखे-पाटील यांनी यावेळी केली.

दरम्यान, आझाद मैदानावर आंदोलन करणारे प्रा. संभाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांच्या मागण्या व प्रकृतीची माहिती घेतली. राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगताच विखे-पाटील यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत नाराजी व्यक्त केली. 

संबंधित लेख