radhakrishana vikhe patil criticise shivsena | Sarkarnama

माझ्याबद्दल कोण काय बोलते, याकडे फार लक्ष देत नाही : विखे पाटील 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणाबाबत कॉग्रेसची भूमिका आम्ही सभागृहात मांडली आहे. विरोधी पक्षनेता म्हणून बोलत असताना कॉग्रेसची भूमिका मांडतो. दिल्लीत आमची बैठक होणार होती. आरक्षणाच्या बाबतीत चर्चा होणार होती. मात्र करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराला जावे लागल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली. पुढील आठवड्यात ही बैठक होणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. 

नगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही कायम लढलो. मी स्वतःच आंदोलनात होतो, त्यामुळे वेगळी भूमिका असण्याचे कारण नाही. सरकारमधील मंत्र्यांची भूमिका मात्र वेगळी आहे. भाजप सरकारमधील मंत्री बोलत नाहीत. शिवसेनेची दुटप्पी भूमिका रोज समोर येते, अशी टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

मराठा समाजाच्या मोर्चानंतर विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. 

विखे म्हणाले, माझ्याबद्दल कोण काय बोलते, याकडे मी फार लक्ष देत नाही. सरकारकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मुंबई महापालिकेत एकमेकांची औकात काढली. सरकारमधील पहारेकरीच झोपलेला आहे. सरकारमध्ये रहायचे, मलिदा खायचा आणि सरकारवरच टीका करायची, असे शिवसेनेचे धोरण असल्याचे ते म्हणाले. 

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांनी येवू नये, अशी मागणी मराठा समाजाने केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक साप सोडणार असल्याचे विधान करून समाजाची अवहेलना केली. समाजातील लोक अधिक चिडले. प्रवरासंगममध्ये काकासाहेब शिंदेची आत्महत्या हे पोलिसांच्या दुर्लक्षपणाचे कारण आहे. तेथे पोलिसांनी युवकांना का जाऊ दिले. केवळ पोलिसांनी ढिलाई दाखविल्यामुळे एका निरापराध व्यक्तिचा बळी गेला,असा आरोप विखे पाटील यांनी केला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख