Radha Mohan Singh Nagpur | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या नेत्यांना दुकानदारी बंद होण्याची भीती : राधामोहन सिंग 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 जून 2017

शेतकरी नेते म्हणून सुरू असलेली दुकानदारी बंद होण्याच्या भीतीने राज्यात असेच लोक षडयंत्र रचून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.

- केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग

नागपूर : आज शेतकरी हिताच्या गोष्टी करणारे कधीकाळी सत्तेत होते, तेव्हा त्यांनी काहीच केले नाही. त्यांच्याच काळात देश कृषी क्षेत्रात मागे राहिला. पण आज तेच संसदेत कृषी व सिंचनात माघारल्याची कारणे विचारतात, तेव्हा हसावे की रडावे हेच कळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर विरोधकांनी नौटंकी करणे बंद करावे, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी केली. 

"नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड'च्या "मदर डेअरी' प्रकल्पाचे लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आदी उपस्थित होते. 

राधामोहन सिंग म्हणाले, ""शेतकरी नेते म्हणून सुरू असलेली दुकानदारी बंद होण्याच्या भीतीने राज्यात असेच लोक षडयंत्र रचून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. शेतकरी हिताची जी कामे सत्तेत अनेक वर्षे राहूनही विरोधकांना करता आली नाहीत तेवढी कामे मोदी सरकारने तीन वर्षांत झाली आहेत. मागच्या सरकारमध्ये कृषी धोरण ठरविताना दीडपट उत्पन्नाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. आज तेच लोक स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी ओरडत आहेत.'' 

19 जिल्ह्यात प्रकल्प राबवा- गडकरी 
"मदर डेअरी'ने विदर्भ मराठवाड्यातील 11 जिल्ह्यांपुरते मर्यादित न राहता सर्व 19 जिल्ह्यांत हा प्रकल्प राबवावा, अशी मागणी नितीन गडकरी यांनी राधामोहन सिंग यांच्याकडे केली. या प्रकल्पासाठी केंद्राने 650 कोटींची तरतूद केली आहे. प्रकल्पाच्या व्यापक अंमलबजावणीसाठी राज्य सरकार मनुष्यबळ पुरविणार आहे. मात्र, येत्या वर्षभरातच दुध संकलन 2 लाख लिटरपेक्षा अधिक व्हावे. भविष्यात विदर्भ आणि मराठवाड्यात "मदर डेअरी'ने 25 लाख लिटर दुधाच्या उत्पादनाचे उद्दिष्ट्‌य गाठावे, अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्‍त केली. 

चाऱ्यासाठी अनुदान - फडणवीस 
दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी दर्जेदार चाऱ्याची गरज असून विदर्भ आणि मराठवाड्यात चाऱ्याचे उत्पादन वाढविण्याची आवश्‍यकता आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी चारा उत्पादन केल्यास त्यासाठी सरकारतर्फे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पौष्टीक घटक असलेल्या चाऱ्याचे उत्पादन शेतकरी कंपन्यांनी करण्यसाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

या जिल्ह्यांचा समावेश 
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व "मदर डेअरी'तर्फे विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा, यवतमाळसह मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, जालना, परभणी या 11 जिल्ह्यांत दुध उत्पादन वाढीचा आणि संकलनाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. 

काय आहे प्रकल्प 

  • तीन वर्षांचा कालावधी 
  • विदर्भ-मराठवाड्यातील 11 जिल्हे 
  • सध्या 740 गावांमधील 8 हजार शेतकऱ्यांकडून दुध संकलन 
  • सद्यस्थितीत 40 हजार लिटर दुधाचे संकलन 
  • दुध संकलनापोटी 30 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात 
  • नागपुरात "मदर डेअरी'च्या 40 बुथमधून दुधाची विक्री 
  • तीन वर्षात 2 लाख लिटर दूध संकलनाचे उद्दीष्ट्य 
  • शासकीय दुध योजनांचे "मदर डेअरी'कडे हस्तांतरण 
  • प्रत्येक शहरात "आऊटलेट' उघडण्यासाठी सहकार्य

संबंधित लेख