आधी भाजपमध्ये कोणीच येत नव्हते - रावसाहेब दानवे
औरंगाबाद महापालिकेतील भाजपप्रणित बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या मेळाव्यात ते बोलत होते. कामगार मोर्चातून बाहेर पडलेल्या महापालिकेतील शेकडो कामगारांनी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र संघटनेची स्थापना केली.
औरंगाबाद : आधी भाजपचा झेंडा हातात घ्यायला कोणीच तयार होत नव्हते, भाजप म्हटले की सगळे दूर पळायचे. " पहले रोटी खायेंगे, कॉंग्रेस को चून के लायेंगे' ही घोषणा आता जुनी झाली आहे. डोक्यातला जुना विचार काढून टाका आणि मुख्य प्रवाहात सामिल व्हा असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महापालिकेतील कामगारांना केले.
औरंगाबाद महापालिकेतील भाजपप्रणित बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या मेळाव्यात ते बोलत होते. कामगार मोर्चातून बाहेर पडलेल्या महापालिकेतील शेकडो कामगारांनी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा पहिला मेळावा रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडामोडे यांच्या उपस्थितीत आज (ता.5) घेण्यात आला. भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांना देखील मेळाव्याला आमंत्रित करण्यात आले होते. पण त्यांनी गैरहजर राहून आपली नाराजी दर्शवली.
कामगारांना मार्गदर्शन करताना रावसाहेब दानवे यांनी केंद्र व राज्य सरकारकडून दलित व गोरगरीबांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लेखाजोखाच मांडला. दलित समाज भक्कमपणे भाजपच्या पाठीशी उभा असल्याचा उल्लेख करतानाच कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोनवेळा लोकसभा निवडणुकीत कसे पराभूत केले याचा इतिहास सांगितला. या उलट भाजप सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान असलेल्या महु गावाचा विकास केला, बाबासाहेबांच्या भव्य स्मारकासाठी इंदू मिलची जागा उपलब्ध करून दिली, लंडनमध्ये ज्या इमारतीमध्ये त्यांचे वास्तव्य होते ती वास्तू राज्य सरकारने खरेदी, बाबासाहेबांच्या 125 व्या जयंती निमित्त दलित समाजाच्या विकासासाठी 125 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याचे सांगतिले. कॉंग्रेसने मात्र बाबासाहेबांचा छळच केला, कॉंग्रेसला कंटाळूनच त्यांनी कायदामंत्री पद सोडले होते हे सांगायला देखील दानवे विसरले नाहीत.
कामगार नाव घेतील असे काम करून जा
व्यासपीठावर बसलेले महापौर भगवान घडमोडे यांच्याकडे कटाक्ष टाकत रावसाहेब दानवे यांनी तुमचे आता फक्त 26 दिवस शिल्लक राहिल्याची आठवण करून दिली. तुम्हाला पुन्हा महापौर व्हायचे का? अशी गुगली देखील टाकली. बापू मला कधी महापौर वाटलेच नाही तर ते कामगारच वाटतात. मोठ्या संघर्षातून ते या पदापर्यंत पोहचले आहेत. तेव्हा बापू पदावरून जाण्यापुर्वी कामगारांसाठी असे काही काम करून जा की त्यांनी तुमची कायम आठवण ठेवली पाहिजे असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले. तुम्ही आता भाजप सोबत आले आहात, तेव्हा वेतनश्रेणी आणि वाढीव सानुग्रह अनुदानाचे प्रश्न लवकरच सोडवू असे आश्वासन देखील दानवे यांनी उपस्थित कागारांना दिले.