r k powar reply to mahesh jadhav | Sarkarnama

चंद्रकांतदादांची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा प्रश्नच नाही!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

आमदार मुश्रीफ हे राजकीयदृष्ट्या अपरिपक्व निश्चितच नाहीत.

कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांतदादांची हत्तीवरून मिरवणूक काढावी, असा टोला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी लगावला आहे. मात्र हे विधान अपुऱ्या ज्ञानावर आणि अर्धवट माहितीवर आधारित असल्याचा प्रतिटोला राष्ट्रवादीचे पार्टीचे शहराध्यक्ष आर के पोवार, जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील व राज्य कार्यकारीणी सदस्य राजू लाटकर यांनी लावला आहे. 

पत्रकात म्हटले आहे, राज्य सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना युतीचे स्पष्ट बहुमत असताना मराठा आरक्षण विधेयक मंजूर होणार नाही असे वाटण्याजोगे, आमदार मुश्रीफ हे राजकीयदृष्ट्या अपरिपक्व निश्चितच नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून आणि ते व्यक्तिगतरीत्या नेहमीच आग्रही राहिले आहेत.

२४ ऑक्टोबर २०१८ रोजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत शेतकरी परिषदेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोडोली येथे आले होते. त्याच सभेत मुख्यमंत्र्यांनी साखरेचा किमान दर क्विंटलला ३१०० रुपये करू, ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये ज्यादा देण्यासाठी सरकारची तिजोरी रिकामी करू तसेच निर्यात साखरेला क्विंटलला अकराशे रुपये अनुदान देऊ, अशा घोषणा केल्या होत्या. या तिन्ही घोषणा एक नोव्हेंबर २०१८ पासून अमलात आल्यास मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढू, अशी प्रतिक्रिया आमदार श्री मुश्रीफ यांनी दिली होती. मात्र जाधव अर्धवट माहितीच्या आधारे काहीही बोलत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.

 

संबंधित लेख