question the contractors for potholes on road in MNS style : Raj Thakray | Sarkarnama

कंत्राटदारांना रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मनसे शैलीत जाब विचारा : राज ठाकरे 

सरकारनामा
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

कोट्यवधी रुपयांचे रस्ते बनवले जातात. परंतु, काही दिवसांनंतर या रस्त्यांवर खड्डे पडतात कसे?  जर रस्त्यावर खड्डा पडला तर सरळ रस्त्यांच्या कंत्राटदारांना जाब विचारा.

-राज ठाकरे

मुंबई  : कोकणातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मनसे शैलीत कंत्राटदारांना जाब विचारण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याने ऐन गणेशोत्सवात टाळ मृदुंगाच्या गजरा बरोबर मनसैनिकांचा खळ खट्ट्याकचाही गजर घुमण्याची शक्‍यता आहे.

 कोकणात कोट्यवधींचे रस्ते बांधल्यानंतर काही दिवसातच खड्डे पडतात कसे? असा सवाल करीत रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतर कंत्राटदारांना जाब विचारा असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रवींद्र नाट्य मंदिरात मुंबई, ठाणे व पालघर येथील मनसे कार्यकर्त्यांचा 'कोकणवासियांचा मेळावा' आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

गणपतीसाठी मुंबई, ठाण्याहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. कोकणात जाताना खड्ड्यांचे विघ्न गणेश भक्तांसमोर आहे, असे सांगून राज ठाकरे म्हणाले , " कोट्यवधी रुपयांचे रस्ते बनवले जातात. परंतु, काही दिवसांनंतर या रस्त्यांवर खड्डे पडतात कसे?  जर रस्त्यावर खड्डा पडला तर सरळ रस्त्यांच्या कंत्राटदारांना जाब विचारा. नाशिकमध्ये अजूनही रस्त्यांना खड्‌डे न पडण्याचे कारण कंत्राटदारांना तशी तंबीच दिलेली होती "

" शहरी भागांप्रमाणे ग्रामीण भागातील मनसे कार्यकर्त्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक गावातील मनसैनिकांना बळ देण्याचं काम मुंबईतील कार्यकर्त्यांनी करायला हवे," असेही राज यावेळी म्हणाले.  

 "कोकणातील जागा बळकावण्यासाठी परप्रांतीयांनी कंबर कसली असून अनेक जागा त्यांनी बळकावल्या आहेत. कोकणाने जगाला रत्न दिली पण कोकणाकडे सर्वच राजकीय पक्षांकडून दुर्लक्ष झाले आहे . कोकणात विध्वंसक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न होत आहे. कोकणची वाट लावणारे प्रकल्प जाणीवपूर्वक राबवले जात आहे, असा आरोप करीत त्यांनी जैतापूर आणि नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवला. कोकणच्या लोकांनी जमिनी विकू नये, असे आवाहनही राज यांनी यावेळी केले.

 

संबंधित लेख