pustakanche gaw bhilar | Sarkarnama

"पक्षाचा उंबरठा' ओलांडला ; सीएम' फडणवीसांचे बॅलन्स पॉलिटिक्‍स ! 

उमेश बांबरे 
गुरुवार, 4 मे 2017

मुख्यमंत्र्यांनी राजकारण केले नाही. पण पूर्ण भिलारचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचाच असल्याचा भास निर्माण झाला. रस्त्याच्या दुतर्फा कमळाचे झेंडे आणि भाजपच्या नेते व पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे झेंडे लावले होते. त्यामुळे पुस्तकाच्या गावाचे लोकार्पण की भाजपचे कॅम्पेनिंग असा प्रश्‍न उपस्थित होत होता. या सर्व परिस्थितीत पुस्तक प्रेमी आणि साहित्यिक मात्र, पुस्तकांच्या गावातील घराघरांतील ग्रंथालयांना भेटी देऊन तेथील नागरिकांचे मते जाणून घेत होते. 

भिलार (जि. सातारा) : राज्याच्या मराठी भाषा विभागातर्फे पुस्तकांचे पहिले गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिलार गावचे मार्केटिंग सुरू असताना प्रत्यक्ष भिलार गावात बाराभानगडींना ऊत आला होता. या संकल्पनेच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भिलारमध्ये येत असताना त्यांनी राष्ट्रवादीला मानणाऱ्या घरात भेट द्यावी की भाजपला मानणाऱ्या, यावरून वाद सुरू होता. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही घरांत जाऊन या विषयाला वेळीच पूर्णविराम दिला ! 

भिलार गावावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा प्रभाव आहे. तेथील सरपंच या राष्ट्रवादीला मानणाऱ्या आहेत. या संकल्पनेच्या निमित्ताने गावात 25 ठिकाणी ग्रंथालये सुरू केली आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. सरपंचांनीही त्यांच्या घरी ग्रंथालय केले आहे. या दौऱ्यात निमित्ताने मुख्यमंत्री सरपंचांच्या घरी जाणार होते. त्यानुसार त्यांनी तयारी केली होती. पण भाजपच्या भिलार व वाईतील पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आमचे अन ते राष्ट्रवादीच्या घरात जाणार, हे खटकले होते.

यातून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांत वाद झाला होता. पण मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात हा वाद दिसू नये म्हणून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे तुम्हीच नियोजन करा, असे सांगितले. त्यानंतर भाजपच्या माजी सरपंचाने आपल्या घरीही मुख्यमंत्री येणारच या उद्देशाने सर्व तयारी केली. आता प्रश्‍न होता, मुख्यमंत्री दोघांपैकी कोणाच्या घरी जाणार. पण मुख्यमंत्र्यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवत गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंचांच्या घरी प्रथम भेट देऊन तेथील ग्रंथालयाला भेट दिली. त्यानंतर भाजपच्या माजी सरपंचांच्या घरीही भेट देऊन तेथील ग्रंथालयाची पहाणी केली. त्यामुळे भिलार मधील दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांतील वादाला पूर्ण विराम मिळाला. 

 

 

संबंधित लेख