pustakanche gaw | Sarkarnama

पुस्तकांच्या गावात मुख्यमंत्री कोणाच्या घरी जाणार ? 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे नेते संतप्त झाले असून त्यांनी तुम्हीच सर्व कार्यक्रमाचे नियोजन करा, आम्ही बाजूला थांबतो, अशी भूमिका घेतल्याने सर्वांचीच अडचण झाली आहे. आता मुख्यमंत्री कोणाच्या घरी जाणार याचीच भिलारमध्ये उत्सुकता आहे. 

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी पुस्तकांचे गाव संकल्पनेच्या उद्‌घाटनासाठी भिलारमध्ये येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांत उत्साह संचारला आहे. मात्र मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरपंचाच्या घरी जाणार असल्याने त्यांच्यात अस्वस्थताही आहे. 

भिलार येथे सरपंचांच्या घरी अल्पवेळ मुख्यमंत्री थांबून चहापान करणार आहेत. सत्ता भाजपची, मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री भाजपचे असूनही राष्ट्रवादीच्या सरपंचाच्या घरी मुख्यमंत्री जाणार हे भिलार व वाईतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना खटकले आहे. त्यांनी या विरोधात भूमिका घेत मुख्यमंत्री भिलारचे माजी सरपंच व सध्याचे भाजपचे कार्यकर्ते यांच्या घरीही येतील या दृष्टीने घरासमोर मांडव टाकून तयारी केली आहे. मुळात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात प्रत्यक्षात दोनच ठिकाणी ते ग्रंथालयाच्या संदर्भात भेट देऊन पाहणी करणार आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख