purushottam jadhav press in satara | Sarkarnama

उदयनराजेंसोबत लढायला आवडेल, यावेळेस मला माझे नशिब साथ देईल!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

शरद पवार यांनी संधी उपलब्ध केल्यास मी त्या संधीचे सोने करेन.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले माझे मित्र असून त्यांच्यासोबत कुस्ती लढायला आवडेल, असे मत भाजपचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी व्यक्त केले. 

कुस्ती दंगल स्पर्धेसाठी पुरूषोत्तम जाधव यांनी सातारा जिल्हा संघाची मालकी घेतली आहे. याची माहिती देण्यासाठी आज त्यांनी येथील शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. 

साताऱ्याला कुस्तीची परंपरा आहे. या परंपरा पुढे वाढविण्यासाठी मी या संघाचे नेतृत्व स्वीकारले आहे, असे सांगून श्री. जाधव म्हणाले, मागील वेळी लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून मी तयारी केली होती. पण हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आला. मोदी लाटेत केवळ तिकिट न मिळाल्याने मी अपक्ष निवडणुक लढलो आणि अडीच लाख मते मिळविली.

सातारकरांच्या प्रेमापोटी मी निवडणुक लढलो आणि सातारकरांनी मला साथही दिली. त्यावेळी षडयंत्र झाल्याने मला तिकिट मिळाले नाही. त्यावेळी माझे नशिब नव्हते. यावेळेस मला माझे नशिब साथ देईल.

ऐनवेळी हा मतदारसंघ मित्र पक्षांच्या वाटणीला जातो, यावेळी याबाबत कशी काळजी घेणार असे विचारले असता ते म्हणाले, साताऱ्याकडे बघण्याचा दुष्टीकोन कसा आहे, हेच मला समजत नाही. मी यावेळेसही तयारी केली आहे. पक्षाने आदेश दिल्यास मी निवडणुकीसाठी तयार आहे. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांतून खासदार उदयनराजेंना विरोध होत आहे. त्यामुळे सर्वजण शरद पवार सातारा लोकसभेसाठी कोणाचे नाव सूचविणार याची वाट पहात आहेत. त्यांनी तुम्हाला संधी दिल्यास तुम्ही काय कराल, असे विचारले असता श्री. जाधव म्हणाले, शरद पवार यांनी संधी उपलब्ध केल्यास मी त्या संधीचे सोने करेन. शेवटी साताऱ्याचा विकास झाला पाहिजे, अशी माझी भावना आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कुस्तीच्या माध्यमातून सातारकरांच्या प्रेमाचे मतात रूपांतर होईल, असे तुम्हाला वाटते का, या प्रश्‍नावर त्यांनी मतांत परिवर्तन होईल का नाही ते आताच सांगता येणार नाही. पण सातारकर जनतेचे माझ्यावर प्रेम आहे. त्यांच्या प्रेमापोटी मी येथील कुस्तीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 
 

संबंधित लेख