purna-patel-marriage | Sarkarnama

खासदार प्रफुल्ल पटेल यांची कन्या पूर्णा पटेल यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त भंडारा-गोंदियातील 600 कार्यकर्त्यांना विमानप्रवास

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची कन्या पूर्णा पटेल यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 600 कार्यकर्त्यांना विमानप्रवास घडला. या विवाह व स्वागत सोहळ्यानिमित्त प्रफुल्लभाईंच्या प्रेमाने हे सारे वऱ्हाडी `जिवाची मुंबई' करून आले.

भंडारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची कन्या पूर्णा पटेल यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 600 कार्यकर्त्यांना विमानप्रवास घडला. या विवाह व स्वागत सोहळ्यानिमित्त प्रफुल्लभाईंच्या प्रेमाने हे सारे वऱ्हाडी `जिवाची मुंबई' करून आले.
 
एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याच्या मुलामुलींचा वा सेलिब्रिटीचा विवाह सोहळा हा नेहमीच सामान्य माणसासाठी औत्सुक्‍याचा व आकर्षणाचा विषय असतो. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा मुंबईत अधिक वट आहे. हे त्यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले. आतापर्यंत त्यांनी अमिताभ बच्चनपासून सलमान खानपासून मुकेश अंबानीपर्यंत अनेक राजकीय, औद्योगिक क्षेत्रातील बड्या असामींना गोंदियात आणले. आपल्या कन्येच्या लग्नाच्या निमित्तानेदेखील प्रफुल्लभाईंनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. 

मुंबईत थाटामाटात झालेल्या कार्यक्रमाला भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील तळागाळातील सामान्य कार्यकर्ते व नागरिक मात्र वंचित राहिले. प्रफुल्ल पटेलांकडून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी व नेत्यांसाठी विमानाची सोय करण्यात आली होती. ज्यांना या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तिकिटं मिळाली, ते हुरळून गेले. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असले तरी त्यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना वगळले नाही. आठवणीने त्यांनाही निमंत्रणे व विमानाची तिकीटे पाठविली. 

हा सोहळा "याचि देही याचि डोळा' अनुभवणाऱ्यांच्या आनंदाला पारावर नव्हता. या जिल्ह्यातील सामान्य नागरिकाला मात्र या लग्नाची पुसटशी कल्पनाही नव्हती. कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी फेसबुक, ट्‌विटर अन्‌ व्हॉट्‌सऍपवर आपली सेल्फी अन्‌ छायाचित्रे अपलोड करून आम्ही प्रफुल्लभाईंच्या `खास' मर्जीतील असल्याचा जणू पुरावा यानिमित्ताने देण्याची स्पर्धाच चालविली होती. 

बॉलीवूड अन्‌ झाडीवूड 
पूर्णा पटेल यांच्या लग्नाला अख्खे बॉलीवूड अवतरले होते. लहान-मोठ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेण्याची तेवढी `इच्छा' पूर्ण करून घेतली. कधी नव्हे, ते पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायला मिळाले. तेथून परतल्यानंतर गावातील कट्ट्यांवर रंगलेल्या गप्पांच्या फडात विवाह सोहळ्याचे वर्णन करताना कार्यकर्ते थकता थकले नाहीत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख