pune-vinayak-nimhan-opposes-congress-workers | Sarkarnama

कॉंग्रेस पदाधिकऱ्यांच्या ठरावाने विनायक निम्हण यांची पंचाईत 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 ऑगस्ट 2018

शिवसेनेत असलेल्या माजी आमदार विनायक निम्हण यांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका घेत कॉंग्रेस पक्षातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी ठराव केल्याने निम्हण यांची पंचाईत झाली आहे.

पुणे : शिवसेनेत असलेल्या माजी आमदार विनायक निम्हण यांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका घेत कॉंग्रेस पक्षातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी ठराव केल्याने निम्हण यांची पंचाईत झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसमधील दोन माजी शहराध्यक्ष तसेच इतर जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची बैठक घेतली. या बैठकीत निम्हण यांना विरोध करून पदाधिकाऱ्यांनी एकप्रकारे वरिष्ठांनाच आव्हान दिल्याचे मानले जात आहे. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सहमतीने निम्हण यांना पक्षात घेण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाची वेळ अद्याप ठरलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यावर प्रतिक्रिया उमटली. या बैठकीला चाळीसहून अधिक पदाधिकारी, आजी-माजी आमदार, नगरसेवक यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत जवळपास सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यथांना वाट मोकळी करून देतानाच पक्षश्रेष्ठींनी निष्ठवंताना डावलून बाहेरच्या पक्षातील कोणालाही प्रवेश दिला, तर आम्ही ते आदेश पाळणार नाही, पक्षाचे काम करणार नाही, असा इशारा या बैठकीत अनेकांनी दिला. सदस्यांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन एकमताने ठराव मांडण्यात आला आणि तो मान्य करून राहुल गांधी आणि अशोक चव्हाण यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात न घेताच पक्षातील इच्छुकांना विधानसभेची तयारी करण्यास सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे निम्हण यांच्यासारख्या एकेकाळी कॉंग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा निर्णय परस्पर घेण्यात येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. 

दोन महिन्यांपूर्वी रवींद धंगेकर यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. चव्हाण यांनी धंगेकर यांना कसबा विधानसभा मतदारसंसंघातून निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले. त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक असलेले अनेकजण नाराज झाले. पुण्यासंदर्भातील निर्णय घेताना पुण्यातील पदाधिकऱ्यांना विश्‍वासात घ्यावे, अशी पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र निम्हण आणि धंगेकर या दोघांबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी परस्पर निर्णय घेतल्याने पक्ष कार्यकर्त्यांच्या नाराजीत भर पडली आहे. 
 

 
 

संबंधित लेख