pune-vinayak-mete-supports-CM | Sarkarnama

आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी : विनायक मेटे 

उमेश घोंगडे 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी अनेकदा पुढाकार घेतला असून हे सरकार मराठा समाजाच्या विरोधात आहे, हे म्हणणे चुकीचे आहे, असे मत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आज पुण्यात सांगितले. 

पुणे : शिवजयंतीच्या तारखेचा घोळ युती सरकारच्या काळात संपुष्टात आला. आण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना झाली. ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजासाठी अनेक सवलती मिळाल्या. या सरकारच्या काळात शिवस्मारकाचा प्रश्‍न मार्गी लागला. या सरकारने मराठा समाजासाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री बदलावा, ही मागणी चुकीची असून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी आहोत. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी अनेकदा पुढाकार घेतला असून हे सरकार मराठा समाजाच्या विरोधात आहे, हे म्हणणे चुकीचे आहे, असे मत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आज पुण्यात सांगितले. 

आरक्षणासाठी उभारलेल्या लढा चालूच राहील. आरक्षणदेखील मिळणारच आहे. मात्र आंदोलन करताना आत्महत्या करून टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन मेटे यांनी या वेळी केले.

मराठा समाजाने इतरांना त्रास होणार नाही, अशा शांततेच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करायला हवे. कोणतेही प्रश्न चर्चा आणि संवादाने सुटतात. मराठा समाजाचे अंतिम हित लक्षात घेऊन सरकारकडे आरक्षणाबाबतची भूमिका मांडणे गरजेचे आहे. या लढयात आत्महत्या होता कामा नये. आरक्षणाच्या लढयाला कोणा एकाचे नेतृत्व मान्य नसेल, तर प्रत्येक जिल्हयातील आंदोलनकर्त्यांमधील लोकांनी एकत्र येऊन सामुहिकपणे चर्चा करण्याकरीता पुढे यायला हवे. तसेच समाज बांधवांसमोर ही चर्चा "लाईव्ह' असणे गरजेचे आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका वाढत असून मुख्यमंत्र्यांसोबत पुढील दोन दिवसात शिवसंग्रामचे शिष्टमंडळ बैठक घेऊन चर्चेने प्रश्न सोडविण्यास प्रयत्न करणार आहे, असे आमदार मेटे यांनी सांगितले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख