pune-vijay-shivtare-jalindhar-kamathe | Sarkarnama

राज्यमंत्री विजय शिवतारे सरकारचे एजंट आहेत का?;  जालिंदर कामठे यांचा सवाल 

गजेंद्र बडे
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमिनी देण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे प्रथम शेतकऱ्यांशी चर्चा करून, याबाबतची पुढील कार्यवाही होण्याची गरज आहे. पंरतु राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हा प्रकल्प बिओटी तत्वांवर (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) पुर्ण करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवतारे हे काय सरकारचे एजंट आहेत काय, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस जालिंदर कामठे यांनी शनिवारी (ता.22) केला आहे.

पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमिनी देण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे प्रथम शेतकऱ्यांशी चर्चा करून, याबाबतची पुढील कार्यवाही होण्याची गरज आहे. पंरतु राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हा प्रकल्प बिओटी तत्वांवर (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) पुर्ण करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवतारे हे काय सरकारचे एजंट आहेत काय, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस जालिंदर कामठे यांनी शनिवारी (ता.22) केला आहे. कामठे यांच्या या सवालाने पुरंदर विमानतळाच्या प्रश्‍नावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत जुंपली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे हे पुरंदरचे आमदार आहेत. त्यांनी मागील विधानसभा निवडणूक लढविताना बारामतीचा विकास, पुरंदर भकास असा प्रचार केला होता. एका सहीने गुंजवणीचे प्रकल्पाचे पाणी पुरंदर तालुक्‍यासाठी आणणार अशीही घोषणा केली होती. परंतु गेल्या चार वर्षापासून ते सरकारमध्ये मंत्री आहेत. तरीही त्यांना निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पुर्तता करण्यात यश आलेले नाही, असा आरोपही कामठे यांनी यावेळी केला. 

कामठे म्हणाले, ""कोणत्याही विकासकामांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध नाही. परंतु स्थानिक ग्रामस्थांना उद्‌धवस्त करून विकास करणेही योग्य नाही. या तत्वांनुसार नियोजित पुरंदर विमानतळामुळे तालुक्‍यतील सात गावे पुर्णपणे उद्धवस्त होणार आहेत. या सर्व गावातील ग्रामस्थांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने प्रथम या सर्व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. त्यासाठी त्यांनी ग्रामस्थांची भेट घ्यावी आणि त्यांचीही बाजू समजून घ्यावी आणि ग्रामस्थांच्या मान्यतेनंतरच हे विमानतळ पुर्ण करण्यासंदर्भात पावले उचलली पाहिजेत, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी आहे.'' 

दरम्यान, या विमानतळाच्या प्रश्‍नावरुन निर्माण झालेल्या ग्रामस्थ आणि सरकारच्या वादात राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थानिक ग्रामस्थांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील. आमचा सरकारला नव्हे तर, शेतकऱ्यांना पाठिंबा असेल, असेही कामठे यांनी यावेळी सांगितले. 

संबंधित लेख