पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍लांची बदली करा

 पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍लांची बदली करा

पिंपरी ः पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजविलेल्या पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांची तातडीने बदली करण्याची मागणी पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आज केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. 

शुक्‍ला यांची येथून उचलबांगडी करून तडफदार, खंबीर व प्रशासनाचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांच्याजागी नियुक्ती करावी आणि गुन्हेगारीच्या मगरमिठीत सापडलेल्या दोन्ही शहरांची सुटका करावी, असे साकडे मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले आहे. 

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी, भाईगिरीचे प्राण, निर्माण झालेल्या टोळ्या, खूनसत्राची मालिका आदी गंभीर बाबी चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या. दोघांत दहा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर चौकशी करतो, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे चाबुकस्वार यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आमदारांनी शुक्‍ला यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यात ते म्हणतात,मागील दोन वर्षात श्रीमती शुक्‍ला यांनी पदभार स्वीकारल्यापासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

शुक्‍ला यांच्या रूपाने कायदा सुव्यवस्थेचे वाटोळे करणारी व्यक्ती लाभली हे लोकप्रतिनिधी म्हणून अत्यंत खेदाने मला नमूद करावे लागत आहे. त्यांच्या काळात दोन्ही शहरांना अवैध धंद्यांनी गिळंकृत केले आहे. खून, बलात्कार, हाणामाऱ्या यांचे प्रमाण पाहिले तर कायद्याचा धाक, पोलिसांचे नियंत्रण असा कुठलाच धरबांध इथे राहिलेला नाही. 

रस्त्यावर व चौकाचौकात रंगत असलेले तळीरामांचे अड्डे, उशिरापर्यंत पोलिसांच्या आशीर्वादाने चालू असलेले बिअरबार, क्रिकेटवर चालणारे बेटिंग, सट्टेबाजी, तरुणांकडून संघटितरीत्या होणारी दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड, मसाज पार्लर, रस्त्यांवर वेश्‍या व्यवसायासाठी उभ्या राहणाऱ्या महिला व मुली त्यामुळे पोलिस नावाची यंत्रणा येथे आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.या अवैध धंद्यापोटी दोन कोटी रुपये दरमहा हप्ता कलेक्‍शन होते. व त्याचे वाटप "टॉप टू बॉटम' पोलिस आयुक्तालयापर्यंत केले जाते अशी वार्ता आहे. 

मागील सहा महिन्यांचा आढावा घेतला तर पिस्तुलाचा धाक दाखवून झालेल्या गुन्ह्यांनी,तर कहर केला आहे. शहरात इतकी बेकायदा पिस्तुले येताच कशी? ही चिंतेची बाब आहे. शुक्‍ला यांच्या काळात खबरे देणारी यंत्रणा बासनात गुंडाळली गेली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होऊन ते देखील वैतागले आहेत. एकाच विभागाला टार्गेट करायचे आणि कारवाईचा प्रारंभ करायचा आणि मध्येच अर्धवट सोडायच्या असा प्रकार सुरू आहे.एक सुसंस्कृत पुणे, सांस्कृतिक पुणे, ऐतिहासिक पुणे, शांत पुणे या सगळ्या व्याख्या आता उलट्या क्रमाने झाल्या आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com