पुण्यात कलेक्टर आॅफिसमध्ये आंदोलकांचा आक्रमक #MaharshtraBandh

पुण्यात कलेक्टर आॅफिसमध्ये आंदोलकांचा आक्रमक  #MaharshtraBandh

पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात बंदची घोषणा केल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

या आंदोलनाला कलेक्टर आॅफिसमध्ये हिंसक वळण मिळाले. या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. संयोजकांनी शांतता पाळण्याचे आवाहन करूनही जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. नव्याने बांधलेल्या या जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. केबिन फोडण्यात आले. 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज सकालपासुन शहरासह उपनगरात कडकडीत बंद होता. मोठ्या प्रमाणावर जागोजागी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळी दहा वाजता एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर ' जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा, लाख मराठा' जय जिजाऊ, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही, नाही कोणाच्या बापाचे' अशा घोषणा देत केंद्र व राज्यसरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 

दुपारी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. यामध्ये भगवे झेंडे, उपरणे परिधान करुन पुरुषांसह महिलाचा लक्षणीय सहभाग होता. दुपारी दिडच्या सुमारास मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. पोलिसांनी तो हाणून पाडण्यासाठी शिकस्त करावी लागली. 

पोलिसांवरचा ताण वाढला

शहराच्या मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमधील रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकसेवा, पेट्रोलपंप, भाजी मंडई, बसस्थानके, दुकाने, शॉपिंग मॉल, बाजारपेठा पुर्णत: बंद होत्या. काही ठिकाणी दगडफेक, तोडफोड, दुकाने व भाजी मंडई बंद ठेवण्यावरुन झालेला वाद वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व मुख्य रस्ते, चौकांमध्ये प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे पोलिस प्रशासनावरील ताण वाढला होता.
----------------------
बंदची क्षणचित्रे.....
- प्रमुख चौकांसह रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त 
- भगवे झेंडे, उपरणे, फेटे घालुन दुचाकीवरुन रॅली
- पेट्रोलपंप, सिनेमागृहे, शॉपिंग माॅल, शाळा, महाविद्यालये, बँका पुर्णत: बंद
- एसटी व पीएमपी बसस्थानकांमध्ये शांतता
- पुरुष, महिलांसह युवक, युवतींचा उत्स्फुर्त सहभाग
- शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरातील रस्त्यांवर शुकशुकाट
- दुकाने बंद करण्यावरुन आंदोलनकर्त्यांमध्ये वाद
- काही ठिकाणी दगडफेक, तोडफोडीच्या घटना
- जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला छावणीचे स्वरुप
-------------------------
मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या 

- मराठा समाजाला घटनात्मक वैध आरक्षण द्या
- राजर्षी छत्रपती शाहु महाराज फी प्रतिपुर्ती योजना काटेकोर अंमलबजावणी
- डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता द्या
- प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवन वसतीगृहासाठी शासकीय जमिन द्या
- मराठा कुणबी ओबीसी जात प्रमाणपत्र योजना राबवा
- छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण मानव विकास संस्था अर्थात सारथी कार्यान्वित करा
- आंदोलकावरी गुन्हे मागे घ्यावेत
- ॲट्रसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागु करा
- मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण रोखा
- मराठा समाजाला पदोन्नतीतील अन्याय दुर करा
-----------------------
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com