भाजपने घेतला पुण्यातील व्यापाऱ्यांचा धसका! 

भाजपने घेतला पुण्यातील व्यापाऱ्यांचा धसका! 

पुणे : जीएसटीच्या अंमलबजावणीवरून पुणे शहरांतील व्यापाऱ्यांत सध्या मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. या असंतोषाचा धसका भाजपने घेतला आहे. या व्यापाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने आता कंबर कसली आहे. 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पुण्यातील व्यापाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला भरभरून पाठिंबा दिला. सत्तेत आल्यास स्थानिक संस्था कर (एलबीटी) तातडीने रद्द करण्याचे आश्‍वासन पक्षाने दिल्यामुळे पुण्यातला व्यापारीवर्ग एकसंध होऊन भाजपच्या मागे उभा राहिला. दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे एलबीटी रद्द करण्यात आला. मात्र काही महिन्यातच वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली. 

एक जुलैपासून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली. आता काही अपवाद वगळता सारेच व्यापारी भाजपवर प्रचंड संतापलेले आहेत. व्यापाऱ्यांच्या या संतापाचा फायदा कॉंग्रेसने घेण्याची तयारी केली असून या प्रयत्नाचा भाग म्हणून पक्षाचे माजी शहराध्यक्ष नगरसेवक अभय छाजेड यांच्या पुढाकाराने व्यापाऱ्यांचा नुकताच एक मेळावा घेतला. या मेळाव्याला कॉंग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी मार्गदर्शन केले. 

या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहून शहर भाजप खडबडून जागा झाला आहे. पालकमंत्री गिरीश बापट व पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी व्यापाऱ्यांना पुन्हा आपल्या बाजूने वळवण्याची जबाबदारी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्याकडे सोपविली आहे. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, असे व्यापाऱ्यांना कसे समजावून सांगायचे हा प्रश्‍न आता चोरबेले यांच्यापुढे पडला आहे.

दोन दिवसांपूर्वी 35 जीवनावश्‍यक वस्तुंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलने जाहीर केला. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, असे चोरबेले यांनी सांगितले. मुळात जीएसटीमुळे सरसकट सर्वच व्यापारी नाराज नाहीत, असा दावा करून व्यापाऱ्यांच्या काही समस्या आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा नक्की प्रयत्न करू, असे चोरबेले यांनी सांगितले. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com