पुण्याच्या मुठेला पाडले राज यांनी नवे स्वप्न (सोबत व्हिडिओ)

पुण्याच्या मुठेला पाडले राज यांनी नवे स्वप्न (सोबत व्हिडिओ)

पुणे : बालगंधर्वपासून म्हात्रे पुलापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूनी मुळा-मुठा नदीपात्र विकासाची नवी संकल्पना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पुण्यात मांडली. 360 उद्योजकांकडून प्रत्येकी 25 लाख रूपये मदत घेऊन 840 कोटी रूपयांचा हा प्रकल्प उभारण्याची ही योजना नाशिकच्या गोदा पार्कच्या धर्तीवर सुचविण्यात आली आहे.

बालगंधर्व रंगमंदीर नव्याने बांधून पाच थिएटर उभारण्याबरोबरच, फुलराणी, नदीच्या दोन्ही बाजूंनी फुडपार्क, उद्याने उभारण्याची कल्पना असून महापालिकेला दरमहा सव्वादोन कोटी रूपये उत्पन्न मिळणार आहे. हा प्रकल्प राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहेत.

या प्रकल्पासाठी महापालिका वा राज्य सरकार यांनी एकही रूपया खर्च न करता काम पूर्ण करण्याची कल्पना मांडण्यात आली आहे. यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात यावा, त्या माध्यमातून हे संपूर्ण काम उभे राहावे, अशी संकल्पना आहे. प्रकल्पाचा संपूर्ण निधी उद्योजकांकडून "सीएसआर'च्या माध्यमातून उभारण्याची ठाकरे यांची संकल्पना आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण आज ठाकरे यांनी केले.

यावेळी झालेल्या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, महापालिका आयुक्त कुणालकुमार, भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील पदाधिकारी उपस्थित होते. आधुनिक पुण्याच्या विकासाचा हा प्रकल्प संपूर्णपणे अराजकीय स्वरूपाचा आहे. यात कोणतेही राजकारण आणता कामा नये, असे ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मात्र, मरगळ आलेल्या पक्ष संघटनेला या माध्यमातून नवचैतन्य देण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. पुण्यासाठी स्वप्नवत योजना सादर करून गोदा पार्कच्या धर्तीवर पुण्यातही आगळे-वेगळे काही करता येऊ शकते, हे दाखविण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न यामागे आहे. मात्र, प्रत्यक्षात कागदावर स्वप्नवत वाटणारा हा प्रकल्प प्रत्यक्षात कितपत शक्‍य आहे हे येणारा काळच सांगेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com