pune politics | Sarkarnama

पहिलवान बांदल यांचा निवडणुकीतून पळ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल म्हणजे पुणे जिल्ह्यातील राजकारणात बऱ्याच राजकीय उड्या मारणारे व्यक्तिमत्त्व! मात्र याच बांदल यांना शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीतून चक्क माघार घ्यायला लागली आहे. बांदल हे या बाजार समितीचे सभापती होते. सभापती होण्यासाठी त्यांनी अनेक हरकती केल्या होत्या. त्यामुळे ते चर्चेत आले होते. यंदा मात्र ते या निवडणुकीत नसल्याने भाजपच्या पॅनेललाही धक्का बसला आहे. 

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल म्हणजे पुणे जिल्ह्यातील राजकारणात बऱ्याच राजकीय उड्या मारणारे व्यक्तिमत्त्व! मात्र याच बांदल यांना शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीतून चक्क माघार घ्यायला लागली आहे. बांदल हे या बाजार समितीचे सभापती होते. सभापती होण्यासाठी त्यांनी अनेक हरकती केल्या होत्या. त्यामुळे ते चर्चेत आले होते. यंदा मात्र ते या निवडणुकीत नसल्याने भाजपच्या पॅनेललाही धक्का बसला आहे. 

बांदल यांनी आपल्या सभापतिपदाच्या कारकिर्दीत नक्की काय काम केले, हा वादाचा विषय होऊ शकतो. मात्र तालुक्‍यात आपली मांड बसविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अजित पवार, दिलीप वळसे पाटील असोत की पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी त्यांची सलगी असल्याचे दाखवतात. त्यामुळेच ते कोठूनही कोठे उड्या मारू शकतात. 
शिरूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार व बांदल यांचा कायमच छत्तीसचा आकडा राहिला. या दोघांनी एकमेकांच्या विरोधात अशा खेळी खेळल्या की त्याची पुणे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा झाली. 

बांदल हे राष्ट्रवादीत राहिले; मात्र याच राष्ट्रवादीचे नेते असलेल्या पवार यांना त्यांनी नेहमी अडचणीत आणले. पवार यांना विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत मदत व्हावी म्हणून अजित पवार यांनी बांदल यांना बांधकाम समितीचे सभापतिपद दिले. तरीही बांदल यांनी इतर पक्षांतर्गत विरोधकांनी विरोधात काम केल्याने पवार यांचा भाजपचे उमेदवार बाबूराव पाचर्णे यांच्याकडून सात हजारांनी पराभव झाला. त्यानंतर बांदल यांना पक्षातून काढण्यासाठी पवार समर्थकांनी बराच जोर लावला; पण पक्ष तर सोडणे लांबच, पण त्यांनी पदही सोडले नाही. 

बाजार समितीच्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या सभापतिपदाच्या निवडणुकीत बांदल हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधातील पॅनेलमधून निवडून आले होते. तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सभासदांची तीन मते फोडून बांदल हे सभापती झाले. यासाठी एक कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा होती. मते फुटल्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये भांडणे लागली होती. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मळगंगा नदीवर जाऊन तेथील पिंडीवर हात ठेवून आपण पैसे घेतले नसल्याची शपथ घेतली होती. हा विषय देखील तेव्हा चर्चेचा झाला होता.

राष्ट्रवादीचे बहुमत असूनही बांदल यांना पदावरून काढण्यासाठी पक्षाने प्रयत्न केले नाहीत. हेच बांदल नंतर राष्ट्रवादीत आले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बांधकाम समितीचे सभापतिपदही मिळवले. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारली. मात्र बांदल यांनी पक्षविरोधात बंडखोरी करून आपल्या पत्नीला निवडून आणले. 

या पार्श्‍वभूमीवर शिरूर बाजार समितीची निवडणूक जोरदार होणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी उमेदवारांनी कोट-कोट रुपयांची तयारी केली होती. भाजपचे आमदार पाचर्णे, बांदल हे एकत्र येऊन पॅनेल टाकणार असल्याने अशोक पवार यांच्या पॅनेलला चांगली लढत द्यावी लागणार असल्याची चिन्हे होती. अर्थात बांदल यांची सारी भिस्त हे नव्याने केलेल्या सोसायट्यांच्या नोंदणीवर अवलंबून होती. त्यांनी आपल्या समर्थकांच्या दोनशेहून अधिक सोसायट्यांची नोंदणी केली होती. 

अशोक पवार यांनी उच्च न्यायालयात जाऊन या नोंदणीला स्थगिती घेतली होती. मात्र भाजपचे सरकार असल्याने शेवटपर्यंत काहीतरी मार्ग निघेल, अशी बांदल यांना अपेक्षा होती. मात्र तसे काही घडले नाही. त्यामुळे बांदल व भाजपच्या प्रमुख नेत्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे बांदल यांच्यासह राजेंद्र जासूद, रामभाऊ सासवडे, दादा पाटील फराटे या शिरूरमधील दिग्गजांनी बाजार समितीच्या निवडणुकीतून आपले अर्ज माघारी घेतले. त्यांनी माघार घेतल्याने या निवडणुकीतील सारी मजा निघून गेल्याची मतदारांची भावना निर्माण झाली आहे. 

गेल्या निवडणुकीत बांदल हे एका गावात प्रचारासाठी गेले असताना त्यांना समोरून हंड्यातून पाणी वाहताना काही महिल्या दिसल्या होत्या. पाणी भरून नेणाऱ्या महिला दिसणे हा शकुन मानून त्यांनी या महिलांच्या हंड्यात नोटांची पुडकी टाकली होती. त्याच्या बातम्याही तेव्हा प्रसिद्ध झाल्या होत्या. निवडणुकीतील चुरस संपल्याने मतदारांचा हिरमोड होणे, स्वाभाविक आहे. त्यामुळेच बांदल यांचा या निवडणुकीतील पळ या मतदारांना खटकणारा ठरला आहे. 

याबाबत विचारले असता ते म्हणाले, ""मी माझ्या परीने चांगला कारभार करण्याचा प्रयत्न केला. मला लोकांनी साथ दिली. पण राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना मी मोठे होणे पाहवले नाही. त्यामुळे मी केलेल्या चांगल्या कामाला अडविण्याचा त्यांनी उद्योग केला. मी निवडून जाऊन तेथे काम करू शकणार नसेल तर ते पद घ्यायचे कशाला, असा मी विचार केला. बाजार समितीच्या विकासात कोणते नेते अडसर बनले आहेत, हे मी प्रचारात मांडणार आहेच. त्यामुळे मी निवडणुकीतून पळ काढलेला नाही. काम करणे शक्‍य नसल्याने मी निवडणूक लढविण्याचे टाळलेले आहे.'' 

संबंधित लेख