Pune Political News Adhalrao Patil Shivsena | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

आढळरावांचा सस्पेन्स कायमच

उत्तम कुटे
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. त्यासाठी साडेतीनशे खासदार निवडून आणण्याचे त्यांनी ठरविले आहे. या रणनितीचा भाग म्हणून तगडे विरोधक आतापासूनच गळाला लावण्यास त्यांनी सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आतापर्यंत कमळ न फुललेल्या शिरूरमध्ये ते फुलविण्याचे ठरविले आहे.

पिंपरी : भाजपकडून आलेले आवतण शिरूरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी अद्याप स्वीकारलेले नाही. तसेच ते नाकारलेले नाही. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार की नाही, हा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, स्वत आढळरावांनीही त्याबाबत खुलासा न करीत आपली मुठ झाकलेलीच ठेवली आहे. दरम्यान, भाजपमध्ये ते गेले, तर पिंपरी-चिंचवड,पुणे या दोन्ही शहरांसह पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरण आमूलाग्र बदलणार आहे.

2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. त्यासाठी साडेतीनशे खासदार निवडून आणण्याचे त्यांनी ठरविले आहे. या रणनितीचा भाग म्हणून तगडे विरोधक आतापासूनच गळाला लावण्यास त्यांनी सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आतापर्यंत कमळ न फुललेल्या शिरूरमध्ये ते फुलविण्याचे ठरविले आहे. मात्र, तेथे आढळरावांसारखा खासदारकीची हॅटट्रिक केलेला व मोठा जनाधार असलेला शिवसेनेचा लोकप्रतिनिधी आहे .त्यांनी गतवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्धही शिरूरमधून लढण्याची तयारी केली होती. या मतदारसंघात त्यांना पक्ष नव्हे,तर व्यक्ती म्हणून मतदान होत आहे.

त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. तूर्त त्यांच्या तोडीस तोड उमेदवार भाजपकडे नाही.त्यामुळे आढळरावांनाच गळाला लावण्यासाठी भाजपने जाळे टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यांनी आढळराव यांना जेवणाचं आवतण नुकतेच दिले. मात्र,जेवणापूर्वी्च त्याचा बभ्रा झाला आणि शिवसेनेतच नव्हे, तर उत्तर पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान, तीनदा खासदार होऊनही पक्षात पुरेसा मान दिला जात
नसल्याने आढळराव नाराज असल्याचे समजते. केंद्रात मंत्री करण्यासाठी त्यांच्या ज्येष्ठत्वाचा विचार न झाल्याने त्यांचे कार्यकर्ते यांच्यात सुद्धा अशीच भावना आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले आढळराव हे आपल्या गळाला लागतील, असा भाजपच्या धुरंधरांचा अंदाज आहे.

दरम्यान, या भाजपच्या या आवतणातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नेमका मेसेज गेला आहे.त्यामुळे आढळराव यांनी तूर्त आस्ते कदम जाण्याचे ठरविले आहे.दरम्यान, आढळरावांनी भाजपचं आवतण भविष्यात स्वीकारलं, तर पुणे,पिंपरी-चिंचवडसह उत्तर पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर त्याचा परिणाम होणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरातील एकेक विधानसभा मतदारसंघ शिरूरमध्ये मो़डतो. आढळरावांनी धनुष्यबाण सोडून कमळ हाती धरले,तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात शिरूरच्या जोडीने कमळच फुलण्याची शक्यता आहे.

तसेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यात विधानसभेला घड्याळाचा गजर पुन्हा ऐकू येण्याची शक्यता कमी होणार आहे. त्यातून आढळरावांना एका दगडात दोन पक्षी मारता येणार आहेत. त्यांचे पूर्वीचे मित्र व आताचे शत्रू आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू दिलीप वळसे-पाटील यांचेही खच्चीकरण करता येणार आहे. दुसरीकडे आताच त्यांच्याविरुद्ध लोकसभेला शड्डू ठोकून तयार झालेले भोसरीचे आमदार महेश लांडगे या पैलवानाला कुस्ती न खेळताच चितपट करण्याची संधी मिळणार आहे.

संबंधित लेख