Pune Police superintendent Suvez Haque prepares discipline squad | Sarkarnama

पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांचे  'उद्योगी'  पोलिसांसाठी ’डिसीप्लिन स्क्वाड’

भरत पचंगे : सरकारनामा  
मंगळवार, 13 मार्च 2018

सामान्य नागरीकांना त्रास देण्या-या जिल्ह्यातील ’उद्योगी’ पोलिसांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांनी ’डिसीप्लिन स्क्वाड’ नावाची अनोखी युक्ती वापरलीय. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील जवळपास ५० पोलिसांना या शिस्त पथकाची  ’हवा’ खावी लागलेली आहे.

शिक्रापूर : सामान्य नागरीकांना त्रास देण्या-या जिल्ह्यातील ’उद्योगी’ पोलिसांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांनी ’डिसीप्लिन स्क्वाड’ नावाची अनोखी युक्ती वापरलीय. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील जवळपास ५० पोलिसांना या शिस्त पथकाची  ’हवा’ खावी लागलेली आहे. सध्या दहा जण या स्क्वाडमध्ये दाखल करण्यात आले असून पोलिसांच्या भाषेत या शिक्षेला ’लाल खुर्ची’ असे संबोधले जात आहे.

      जिल्हा पोलिस दलातील सामान्य नागरिकांना त्रास देणारे, हप्ते मागणारे देणारे, तक्रारदारांच्या तक्रारी न घेणारे, आपल्या पोलिस बळाचा वापर करुन इतर धंदे करणारे. अशांची वर्गवारी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातून करण्यात आलेली आहे. जानेवारी-२०१७ मध्ये अधिक्षकपदी रुजू होताच सुवेझ हक यांनी जिल्ह्यातील ३६ पोलिस स्टेशनच्या सर्व अधिका-यांची क्राईम मिटींग मध्ये सुचित केले होते की, कुठल्याही प्रकरणात अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग दिसल्यास त्याला (डिसीप्लिन) शिस्त लावण्यासाठी ’डिसीप्लिन स्कॉड’  (शिस्त पथका)मध्ये दाखल करण्यात येईल.

 पोलिस शिपाई ते फौजदार या पदातील कुणाबाबतही कमाल तक्रारी संकलीत झाल्या की, या शिस्त पथकामध्ये त्यांना दाखल करण्यात येते. या स्कॉडमध्ये दाखल अधिकारी-कर्मचारी यांना दररोज सकाळी ६ वाजता पुणे अधिक्षक कार्यालयात पहिली हजेरी लावायची. पुढे सकाळी दहा, दुपारी चार आणि रात्री साडे आठ अशा चार हजे-या (परेड) लावून मगच घरी जायचे असे त्याचे स्वरुप आहे. पोलिसांच्या भाषेत या शिक्षेला ’लाल खुर्ची’ असे संबोधले जात आहे.

     याबाबत बोलताना उपविभागिय पोलिस अधिकारी पदाच्या एका अधिका-याने याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, तक्रारी असणा-या कर्मचा-यांबाबत आम्ही काय करावे असा आम्हालाही प्रश्न होता. यावर शिस्त पथक नावाचा ’मानसिक-उपचार’ खुपच चांगला असून एरवी फक्त काही हेतूसाठी कामे करणा-या कर्मचा-यांसाठी हा जसा धडा तसाच तो इतर कर्मचारी-अधिका-यांसाठीही पूर्वसुचनेचा संदेशही आहे.

 दोन महिन्यांपूर्वी या स्क्वाड बाबत एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने अर्ज दिला आहे .  पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हे स्क्वाड सुरू करण्यात आले आहे का अशी  विचारणा  माहिती अधिकार कायद्याखाली केली  होती. खरे तर सामान्य नागरिकांना त्रास देणारांबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते कसे जागरूकपणे  काम करतात त्याचा हा नमूना होता. मात्र त्यानंतरही हे शिस्त पथक  सक्रीय ठेवल्याची माहितीही अधिक्षक कार्यालयातून नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठाने दिली.

टॅग्स

संबंधित लेख