Pune news : Tukaram Munde PMP App | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

तुकाराम मुंडेंचा 'पीएमपी'ला 'आयटी' गिअर 

रविवार, 16 जुलै 2017

आता गरज पुरेशा बसगाड्यांची 
तुकाराम मुंडे यांनी पीएमपीला 'आयटी'चा गिअर टाकला आहे. त्यामुळे ती गतिमान होईलच. परंतु आता पोकळी आहे ती बसगाड्यांची. पुरेशा बसगाड्या त्वरित मिळायला हव्यात. दोनशेवर मिडीबस दोन-तीन महिन्यांत मिळण्याची आशा आहे. ऊर्वरित पंधराशे बसगाड्या वर्षाखेरपर्यंत यायला हव्यात. त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि राज्य सरकारने अधिक लक्ष घालायला हवे. पीएमपीमधील या परिवर्तनाला महापालिका आणि सरकारनेही साथ द्यायला हवी. 

पुणे : बसला आणखी वेळ आहे का ? चला तर मग चहा घेऊ... आणि हो चहा घेताना गप्पा रंगतील अन्‌ बसची वेळ झालेली कळणारच नाही, जरा थांबा 'पीएमपी ई-कनेक्‍ट'वर 'रिमाईंडर' लावून ठेवतो.

येत्या काही दिवसांमध्ये आपल्या पुण्यात बसथांब्यावरील संवादाचे स्वरूप असे बदललेले पाहायला मिळू शकेल. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थात पीएमपीएमएलने जुन्या ऍपमध्ये आणखी सुधारणा करून अलीकडेच खुले केलेले 'पीएमपी ई-कनेक्‍ट' ऍप बसने शहरात फिरणाऱ्या प्रवाशांसाठी "परिपूर्ण सेवा ऍप' ठरू शकेल. त्यामुळे आपल्याकडे स्मार्टफोन असल्याचा सार्थ अभिमान तुम्हाला पुण्यात फिरताना वाटेल. गाड्यांच्या वेळापत्रक, थांब्यांच्या वेळा, स्मरणिका, पास काढणे एवढेच नव्हे, तर चालक-वाहकांबद्दल काही तक्रार असल्यास किंवा अन्य कोणतीही तक्रार असल्यास या ऍपवर नोंदवण्याची सुविधादेखील तुम्हाला या ऍपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही तक्रार केली तर त्यावर काय कार्यवाही झाली याची माहितीही तुम्हाला एसएमएसद्वारे मिळणार आहे. हे ऍप अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्रकारच्या मोबाईल फोनसाठी उपलब्ध आहे. 

या ऍपबाबत काही दिवसांपूर्वी बातम्या येऊन गेल्या; मात्र केवळ बातम्या वाचून नव्हे तर ऍप डाऊनलोड केल्यानंतरच त्यातील इतर तपशीलांची माहिती मिळते आणि ऍप वापरण्यातील रंगत वाढते. या ऍपमागे नेमके काय चालले आहे, हेदेखील जाणून घेण्याची उत्सुकता असणारच. शिवाय पीएमपीने ऍप तयार करण्यापूर्वी माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाची सांगड घालून मोठी यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे पीएमपी बस तंत्रज्ञानावर स्वार होऊन अधिक प्रवासी केंद्री आणि गतिमान झाल्या आहेत. मात्र त्याची दृश्‍य जाणीव व्हायला आणखी काही दिवस जाऊ द्यावे लागतील. 

पीएमपीला तंत्रज्ञानाची जोड देऊन ती प्रवासी केंद्री करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. माजी प्रभारी अध्यक्ष श्रीकर परदेशी यांनी त्यासाठी पहिले पाऊल टाकले. मध्यंतरीच्या काळात पीएमपीला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याने ती पोरकीच झाली होती. त्यामुळे तंत्रज्ञानाद्वारे आधुनिकीकरणाची प्रक्रिया थंडावली. चार महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारली आणि आधुनिकीकरणाने पुन्हा वेग घेतला. तंत्रज्ञानासोबतच त्यांनी नवे सात विभाग तयार करून विस्कटलेली घडी नीट बसवण्याचा प्रयत्न चालवला आहे. यापूर्वी पीएमपीमध्ये प्रशासन, कार्यान्वयन आणि वित्त असे तीनच विभाग होते. एवढा मोठा पसारा असलेल्या या महामंडळाकडे मालमत्ता विभागसुद्धा नव्हता. एवढेच काय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असे रुबाबदार नाव असलेल्या पदाचे याआधीचे कार्यालय म्हणजे स्वत: अध्यक्ष आणि त्यांचा स्वीय सहायक, बस्स एवढेच. मग स्वतंत्र "आयटी' विभाग कसा असू शकेल.
 
'पीएमपी ई-कनेक्‍ट' हे ऍप प्रवाशांना मोठी ताकद देणारे ठरेल. ते डाऊनलोड करून ईमेलच्या साह्याने नोंदणी केली की त्याचे ऍपचे काम सुरू होते. ते सुरू केल्याबरोबर तुमच्या जवळच्या पीएमपी थांब्यावर किंवा स्थानकावर किती बस आहेत आणि किती वाजता निघणार आहेत, कुठे जाणार आहेत, किती वेळात जाणार आहेत; बस नसेल तर पुढची बस किती वाजता येणार आहे इत्यादी सर्व आवश्‍यक माहिती प्रवाशाला मिळते. बसमार्ग तपासता येतो, प्रवासाचे नियोजन करता येते, आपला नेहमीचा किंवा आवडीचा प्रवास मार्ग नोंदवून ठेवता येतो, गरज पडेल तेव्हा तक्रार दाखल करता येते. शिवाय एका क्‍लिकवर तुम्ही कोठे आहात हे जवळच्या व्यक्तींना कळवता येते. 

पारदर्शकता वाढणार 
पीएमपीला 'आयटी'वर स्वार करण्याच्या आराखड्याचा एक भाग हे ऍप आहे. त्याबद्दल काही प्रमाणात माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्याचा दुसरा भाग जो पीएमपी अंतर्गत असेल. तो पीएमपीमधील कारभार संपूर्ण पारदर्शक करणारा आहे. आगामी काळात येणाऱ्या बस आणि सध्याच्या बस गृहित धरता सुमारे दोन हजार बसचा ताफा असलेल्या या संपूर्ण यंत्रणेचे कार्यान्वयन एका खोलीतून तीन संगणकाच्या साह्याने होईल असे नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही वेळी वाहक काय करत आहे, त्यावेळी तो कोणते तिकीट देत आहे, तोपर्यंत किती तिकिटे दिली आहेत, तिकिटे देण्याचा वेग पुरेसा आहे काय अशी सगळी माहिती नियंत्रण कक्षात संगणकावर समजणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वितही झाली आहे. एखाद्या बसमार्गावर काम संथपणे चालले तर संगणकावर ते कळते. सबंधित वाहकाच्या कोड नंबर लाल होतो. एरवी तो हिरवा असतो.

संपूर्ण बस ताफ्याचे मिळून किंवा एका मार्गावर किंवा एका फेरीचे उत्पन्न किती झाले आहे हे कोणत्याही वेळी संगणकावर दिसते. कारण सुमारे दोन ते अडीच हजार वाहकांपैकी कोणत्याही वाहकाने तिकीट फाडले की त्याची नोंद नियंत्रण कक्षातील संगणकावर होते. कारण सर्व तिकीट यंत्रे मध्यवर्ती सर्व्हरला जोडली आहेत, तर सर्व बस जीपीएसद्वारे मध्यवर्ती केंद्राला जोडण्यात आल्या आहेत. रुटवर अधिक प्रवासी आहेत आणि कुठे कमी आहेत ही माहितीदेखील समजते. नेहमी तोट्यात असणारा मार्ग समजायला एरवी काही महिने लागतात; मात्र या नव्या सॉफ्टवेअरमुळे ही माहिती तत्काळ मिळते. 

तिकीट यंत्राची बॅटरी डिस्चार्ज झाली किंवा यंत्र खराब झाले अशी कारणेही वाहकांना देता येणार नाहीत. कारण बॅटरी पूर्ण चार्जड्‌ आहे किंवा नाही याची माहिती क्षणोक्षणाला मध्यवर्ती नियंत्रण कक्षातील संगणक सांगत असते. यंत्र खराब झाले तर तेही कळते आणि त्वरित ते बदलून दिले जाते. "यापुढे जाऊन सर्व वाहक, चालक आणि अधिकाऱ्यांचे रेटिंग संगणक यंत्रणेमध्ये आपोआप होणार आहे. कामचुकारपणा केला की रेटिंग घसरेल आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल'', असे पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी सांगितले. आता चालक आणि तपासणी पथकांचे माड्युल अंतिम टप्प्यात आहे आणि तेदेखील महिनाअखेरीस कार्यान्वित होईल. नव्वद टक्के "डॅशबोर्ड' (म्हणजे पीएमपीमध्ये काय चालले आहे याची क्षणोक्षणी माहिती देणारा फलक) तयार आहेत, हे कामदेखील महिनाअखेर संपेल. 

कालपर्यंत "पीएमपी ई-कनेक्‍ट' डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या सुमारे पंधरा हजारांवर गेली होती. हे चित्र नक्कीच दिलासादायक आहे. परंतु जर रोज सुमारे दहा लाख लोक पीएमपी बसने प्रवास करत असतील तर डाऊनलोडची गती वाढायला हवी. तर मग जा ऍप स्टोअरवर अन्‌ करा डाऊनलोड... 

तीन कर्मचाऱ्यांवर संचालन 
माहिती आणि दूरसंचार (आयसीटी) तंत्रज्ञानावर आरूढ झालेल्या पीएमपीच्या बसताफ्याचे संचालन आणि कार्यान्वयन करणे खूपच सोपे होणार आहे. सध्या यासाठी खूप कर्मचारी लागतात. नव्या सॉफ्टवेअर प्रणालीमुळे सुमारे दोन हजार बसचे नियंत्रण एका कक्षातून होईल आणि त्यासाठी अवघे तीनच कर्मचारी लागतील त्यादृष्टीने आपले नियोजन सुरू आहे, असे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

संबंधित लेख