संघाच्या बैठकीत वीज पुरवठ्याचे नियोजन फसले ! 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या दर तीन वर्षांनी होणाऱ्या आढावा बैठकीत महत्त्वाच्या भाषणाच्या वेळीच वीज पुरवठा गायब झाला. त्यामुळे ऐनवेळी "हॅन्ड स्पिकर'वर भाषण करण्याची वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारीणीचे सदस्य सुहास हिरेमठ यांच्यावर आली. पुण्यासारख्या शहरात आणि संघाच्या महत्त्वाच्या बैठकीत वीज पुरवठ्याचे नियोजन कसे फसले, हा मुद्दा या निमित्ताने संघ वर्तुळात चर्चेला आला.
संघाच्या बैठकीत वीज पुरवठ्याचे नियोजन फसले ! 

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या दर तीन वर्षांनी होणाऱ्या आढावा बैठकीत महत्त्वाच्या भाषणाच्या वेळीच वीज पुरवठा गायब झाला. त्यामुळे ऐनवेळी "हॅन्ड स्पिकर'वर भाषण करण्याची वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारीणीचे सदस्य सुहास हिरेमठ यांच्यावर आली. पुण्यासारख्या शहरात आणि संघाच्या महत्त्वाच्या बैठकीत वीज पुरवठ्याचे नियोजन कसे फसले, हा मुद्दा या निमित्ताने संघ वर्तुळात चर्चेला आला. 

संघ परिवारातील 87 पैकी 79 संस्थांचे सुमारे 750 प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. पुण्यात गेल्या तीन वर्षांत लोकसभा, विधानसभा, महापालिकेत भाजपला भरभरून यश मिळाले. या पार्श्‍वभूमीवर संघ परिवाराची बैठक पुण्यातील वानवडीतील महात्मा फुले नाट्यगृहाच्या आवारातील सभागृहात झाली. सुमारे दोन महिन्यांपूर्वीच बैठकीचे नियोजन झाले होते. संघाचे नियोजन म्हणजे आदर्शवत असे समजले जाते. बारीक-सारीक व्यवस्थेकडे लक्ष दिले जाते. मात्र, बैठकीचा समारोप करण्यासाठी हिरेमठ सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास उभे राहिले. त्याचवेळी वीज गेली. 

वीज येण्या-जाण्याचा खेळ सुमारे दहा मिनिटे सुरू होता. त्याला उद्देशून हिरेमठ यांनी "....म्हणूनच विविध संस्थांत समन्वय आवश्‍यक असतो आणि त्यासाठीच बैठक महत्त्वाची असते,' अशी टीपण्णी करून व्यवस्थेतील त्रुटीकडे लक्ष वेधले. 
महापौर मुक्ता टिळक यांच्यासह स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी धावपळ केली. परंतु, "वानवडीतील वीज पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडित होता. त्यामुळे दिवसभर जनरेटरवर सभागृहातील कामकाज झाले. मात्र, समारोपाच्या भाषणाच्यावेळी जनरेटरमधील डिझेल संपल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला,' अशी माहिती पदाधिकाऱ्यांना नंतर मिळाली. या प्रकाराला महावितरण का महापालिकेचा कारभार जबाबदार, अशीही चर्चा समारोपानंतर रंगली होती. महापालिकेच्या नाट्यगृहांची दुर्दशा, या मुद्‌द्‌यावरही पुन्हा एकदा चर्चा झाली. 

भारतीय जनता पक्ष, विश्‍व हिंदू परिषद, जनकल्याण समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आरोग्य भारती, भारतीय मजदूर संघ तसेच आर्थिक, शिक्षण, आरोग्य, संस्कार आदी विविध सेवा क्षेत्रातील संस्थांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर टिळक, खासदार अनिल शिरोळे, सामाजिक विकास मंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, जगदिश मुळीक आणि महापालिकेचे पदाधिकारी तसेच निमंत्रित नगरसेवक उपस्थित होते. समारोपप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कार्यवाह विनायक थोरात, महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर व्यासपिठावर उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com