रमेश बागवेंना चेकमेट करण्यासाठी  पुणे शहर कॉंग्रेसमध्ये वादाचा वणवा 

पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी छाजेड, शिंदे इच्छूक आहेत. त्यामुळे ते सध्या या वादात पडलेले नाहीत. मात्र, शहरात शहराध्यक्ष बागवे यांच्या विरोधात आघाडी उभारणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ज्येष्ठ पदाधिकारी रसद पुरवित असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
रमेश बागवेंना चेकमेट करण्यासाठी  पुणे शहर कॉंग्रेसमध्ये वादाचा वणवा 

पुणे : पुणे शहर हद्दीलगतच्या गावांबाबतच्या आंदोलनाचे निमित्त करीत पुण्यातील कॉंग्रेसमध्ये सुरू झालेल्या वादाचे मूळ हे पुढील एक- दोन महिन्यांत ब्लॉक अध्यक्ष आणि शहराध्यक्षपदाची निवडणुकीत आहे.

ही निवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. ब्लॉक अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यांमधून सहा शहर प्रतिनिधी, प्रांतिकसाठी एक प्रतिनिधी आणि एक ब्लॉक अध्यक्ष निवडला जाणार आहे. शहराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली तर, पुणे शहरातील 12 ब्लॉकमधील प्रत्येकी 8 सदस्य, असे एकूण 96 सदस्य मतदानास पात्र ठरतात. गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता शहराध्यक्ष पक्षाकडून नियुक्त केला जातो. परंतु, यावेळी निवडणूक झाल्यास या निर्णायक मतदारांवर नियंत्रण असावे, या उद्देशाने पक्षांतर्गत संघर्ष सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासमवेत मराठा समाजातून एक कार्याध्यक्ष निवडावा, अशी मागणी एका गटाने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती. परंतु, चव्हाण यांनी "तशी' परंपरा नसल्यामुळे ही मागणी फेटाळून लावली. त्यावेळी नाराज गटाने बागवे यांच्याबद्दलच्या तक्रारी केल्या होत्या. त्यात काही महिला कार्यकत्यांचाही समावेश होता. तसेच चव्हाण हे बागवे यांना शहराध्यक्षपदावरून हटविणार नाही, हे लक्षात घेऊन काही घटकांनी बागवे यांच्याविरुद्ध आघाडी उघडल्याची चर्चा कॉंग्रेस भवनमध्ये आहे. 

या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग मंगळवारी कॉंग्रेस भवनमध्ये आले होते. त्यावेळी शहरातील बहुतेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. परंतु, आमदार अनंत गाडगीळ, प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, प्रदेश सचिव संजय बालगुडे, महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे आदी विविध कारणांमुळे अनुपस्थित होते. त्याबाबतचीही चर्चा कॉंग्रेस भवनमध्ये रंगली होती. तसेच कॉंग्रेसतंर्गत सुरू झालेल्या वादात छाजेड, शिंदे यांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

याबाबत काही कार्यकर्त्यांनी सांगितले की, आगामी काळात पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी छाजेड, शिंदे इच्छूक आहेत. त्यामुळे ते सध्या या वादात पडलेले नाहीत. मात्र, शहरात शहराध्यक्ष बागवे यांच्या विरोधात आघाडी उभारणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ज्येष्ठ पदाधिकारी रसद पुरवित असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. आगामी काळात डॉ. विश्वजित कदम सांगलीमधून निवडणूक लढवण्याची शक्‍यता असल्याने ते पक्षातील या वादात पडलेले नाहीत, अशी पक्षातंर्गत वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही काळात पुण्यातील कॉंग्रेसमध्ये नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com