Pune news - Congress politics | Sarkarnama

पुणे कॉंग्रेसमध्ये स्वतंत्र पालिकेवरून टोलवा-टोलवी

मंगशे कोळपकर 
रविवार, 2 जुलै 2017

पुणे महापालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ला तरी, कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी संपण्याची चिन्हे नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. निमित्त ठरले ते हद्दीलगतच्या 34 गावांच्या समावेशाबाबतचे. गावांचा समावेश पुणे महापालिकेत करू नये, त्यांची स्वतंत्र महापालिका करावी, या मागणीसाठी कॉंग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिकेसमोर दिवसभर उपोषण आंदोलन केले.

पुणे : महापालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ला तरी, कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी संपण्याची चिन्हे नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. निमित्त ठरले ते हद्दीलगतच्या 34 गावांच्या समावेशाबाबतचे. गावांचा समावेश पुणे महापालिकेत करू नये, त्यांची स्वतंत्र महापालिका करावी, या मागणीसाठी कॉंग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिकेसमोर दिवसभर उपोषण आंदोलन केले.

आमदार अनंत गाडगीळ, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक संजय बालगुडे तसेच श्रीकांत शिरोळे आदी अनेकजण त्यात सहभागी झाले होते. गावांच्या समावेशाला विरोध करण्यासाठीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना पाठविले. दुसऱ्या दिवशी त्याच्या बातम्याही छापून आल्या. गावांचा समावेश महापालिकेत व्हावा, यासाठी न्यायालयीन पाठपुरावा करणाऱ्या हवेली नागरिक कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी थेट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याशी संपर्क साधला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच या बाबतची प्रक्रिया सुरू केलेली असताना, शहर कॉंग्रेस त्याला विरोध कशी करते, असा प्रश्‍न करीत त्यांनी विरोध केला. 

चव्हाण यांनी बागवे यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा बागवे यांनी कानावर हातच ठेवले. हे आंदोलन कॉंग्रेसचे नव्हते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. कॉंग्रेसमध्ये आंदोलन करण्यापूर्वी शहराध्यक्षांची परवानगी घेतली जाते तसेच महत्त्वाच्या विषयावर भूमिका ठरविण्यासाठी पक्षाचे शहरातील पदाधिकारी, माजी आमदार यांची बैठक होते. त्यानंतर त्यात निर्णय घेतला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, काही जणांनी केलेले आंदोलन म्हणजे कॉंग्रेसचे नव्हे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आंदोलनाबाबतचा सविस्तर अहवाल प्रदेश कॉंग्रेस, कॉंग्रेस हायकमांडकडे पाठविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला शहराध्यक्षांनाच आमंत्रित केले नव्हते, अशी धक्कादायक माहितीही त्यांनी दिली. काही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीला विरोध करण्यासाठी काढण्यात आलेला मोर्चाही असाच परस्पर काढला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेच्या निमित्ताने कॉंग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. 

संबंधित लेख