PUNE NEWS : Bhama Askhed project | Sarkarnama

भामा आसखेड'च्या पाण्यावरून वडगाव शेरी मतदारसंघ "पेटला' 

उमेश घोंगडे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पुण्याच्या पूर्व भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेला भामा आसखेड प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे या भागातील सोसायट्यांना आजही टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. भाजप सरकार या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली. त्याला विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

पुणे : भामा आसखेड धरणातून पुण्याला पाणी देण्याबाबतचे आरक्षण बदलल्याचे पत्र पाटबंधारे खात्याने दिले असले तरी आरक्षण बदलण्याचा आधिकार कॅबिनेटला आहे. त्यामुळे पुण्याचा भामा असाखेडमधून मिळणाऱ्या दोन टीएमसी पाण्यावर असलेला आधिकार अबाधित आहे. त्याला कुणीही हात लावू शकत नाही, असा दावा वडगाव शेरी मतदारसंघांचे आमदार जगदीश मुळीक यांनी केला आहे. 

याउलट पालकमंत्री गिरीश बापट व विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे या भागाला अजूनही पाणीटंचाई जाणवत असल्याची टीका राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली. 

पुण्याला देण्यात येणाऱ्या 2.2 टीएमसी पाण्याचे आरक्षण बदलल्याचे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिकेला नुकतेच दिले आहे. यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू असून राज्य सरकार व पालकमंत्री गिरीश बापट यांना लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर "सरकारनामा'शी बोलताना आमदार मुळीक यांनी वस्तुस्थिती वेगळीच असून या प्रश्‍नाचे केवळ राजकारण करण्यात येत असल्याचे सांगितले. या कामात गेल्या तीन वर्षांत अनेक अडथळे आले. मात्र त्यावर मात करीत काम सुरू ठेवण्यात आले आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील 80 टक्के काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुण्याचे पाणी कुणीच हिरावून घेऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मोठ्या गतीने मार्गी लागलेला हा प्रकल्प भाजप-शिवसेनेमुळे मागे पडला आणि आता तर या पाण्याचे पुण्यासाठी असलेले आरक्षण बदलण्यात आले आहे. पुण्याच्या पाणी प्रश्‍नावर नेहमी आक्रमक असलेले पालकमंत्री गिरीश बापट स्वत:च्याच सरकारने पाणी पळविल्यानंतर आता काय करणार, हा प्रश्‍न कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून विचारला जावू लागला आहे. पठारे यांनी या प्रश्‍नी आंदोलन करून भाजपवर जोरदार टीका केली होती. 

पुण्याच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाईपलाइन आणण्याची योजना आधीच्या कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने आणली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. त्यासाठी 385 कोटी रूपये निधी दिला. कामाला सुरवातदेखील झाली. मात्र ग्रामीण भागात ज्या गावातून ही पाण्याची लाईन जाते. त्यासाठी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला तसेच काही गावांना पाणी पुरवठा योजनांना पाणी मागण्यात आले. त्यावरून आंदोलन करीत हे काम बंद पाडले. गेल्या वर्षभरापासून हे काम ठप्प आहे. वडगाव शेरीचे मतदारसंघाचे माजी आमदार बापू पठारे यांनी या कामासाठी पाठपुरावा करून हे काम मार्गी लागले होते. 

भाजप सरकारच्या काळात या कामाला गती मिळण्याऐवजी काम बंद पडण्याची वेळ आली आहे. गेले वर्षभर काम बंद असूनही त्यात कोणतीच हालचाल झाली नाही. आता तर आरक्षणाच्या नावाखाली पुण्याचा पाण्याचा हक्कच डावल्यात येत आहे, अशी टीका पठारे यांनी केली. 

संबंधित लेख