pune ncp youth president | Sarkarnama

पुणे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पाचुंदकर यांचा राजीनामा 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 जून 2017

पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडे आणि शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाचा राजीनामा सभापती शशिकांत दसगुडे यांच्याकडे दिला आहे.

तळेगाव ढमढेरे- पुणे ः पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडे आणि शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाचा राजीनामा सभापती शशिकांत दसगुडे यांच्याकडे दिला आहे. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदासाठी डावलल्याचे कारण सांगून त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी दसगुडे यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ घातली. 

पाचुंदकर यांच्या राजीनाम्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये अचानक राजकीय भूकंप झाला आहे. त्यांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे व सभापती दसगुडे स्वीकारणार की नाही, या राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे लवकरच समजणार आहे; मात्र पाचुंदकर यांच्या राजीनाम्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सध्यातरी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पाचुंदकर हे दिलीप वळसे पाटील व माजी आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. आता त्यांच्या राजीनाम्यावर हे दोघे काय निर्णय घेणार, हे येत्या काही दिवसांत कळेल. 

संबंधित लेख