pune-ncp-state-working-committee-atpadi-khanapur-doesn't-get-representation | Sarkarnama

`राष्ट्रवादी'च्या राज्य कार्यकारिणीत आटपाटी, खानापूरच्या वाट्याला दुष्काळच

संपत मोरे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्य कार्यकारिणीत आटपाडी आणि खानापूर या दुष्काळी तालुक्यांच्या वाट्याला दुष्काळच आला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा, तासगाव, पलूस, कवठेमहंकाळ या तालुक्यांना पदे मिळाली आहेत. मात्र एकेकाळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पाठराखण करणाऱ्या खानापूर, आटपाडीला मात्र कार्यकारिणीत डावलले आहे.

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्य कार्यकारिणीत आटपाडी आणि खानापूर या दुष्काळी तालुक्यांच्या वाट्याला दुष्काळच आला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा, तासगाव, पलूस, कवठेमहंकाळ या तालुक्यांना पदे मिळाली आहेत. मात्र एकेकाळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पाठराखण करणाऱ्या खानापूर, आटपाडीला मात्र कार्यकारिणीत डावलले आहे.

१९९९ साली `राष्ट्रवादी'ची स्थापना झाल्यावर या दोन तालुक्यांतील तीन प्रभावी नेते अनिल बाबर, राजेंद्र देशमुख आणि सदशिव पाटील या पक्षात गेले. त्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल बाबर यांचा राजेंद्र देशमुख यांनी पराभव केला होता. या निवडणुकीत सदाशिव पाटील हे देशमुख यांच्या सोबत होते. पण १९९९ साली हे तिन्ही नेते एकाच स्टेजवर आल्याचे चित्र दिसले. या निवडणुकीत अनिल बाबर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली, त्यांनी काँग्रेसच्या रामराव पाटील यांचा पराभव केला.

नंतरच्या काळात बाबर, देशमुख आणि पाटील यांच्यात जमले नाही. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत सदाशिव पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत राष्ट्रवादीच्या अनिल बाबर यांचा पराभव केला. यावेळी देशमुख हे पाटील यांच्यासोबत होते. बाबर एकटेच राष्ट्रवादीत होते. पुन्हा देशमुख राष्ट्रवादीत सक्रिय झाले. 

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत खानापूरची जागा काँग्रेसला गेली. काँग्रेसने सदाशिव पाटील यांना उमेदवारी दिली. तेव्हा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येत अनिल बाबर यांना अपक्ष निवडणुकीत उतरवले. या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. या पराभवानंतरही राष्ट्रवादी भक्कम होती. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनिल बाबर शिवसेनेत गेले, तेव्हा राष्ट्रवादीने आटपाडीच्या अमरसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत देशमुख चौथ्या क्रमाकांवर गेले. इथूनच पक्षाची पडझड सूरु झाली. 

जिल्हा परिषद निवडणुकीत तर माजी आमदार राजेंद्र देशमुख, अमरसिंह देशमुख भाजपात गेल्यावर `राष्ट्रवादी'कडे सगळ्या जागा लढवायला उमेदवार मिळाले नाहीत. तालुक्यातील मोठे नेते भाजपवासी झाल्यावर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जिल्हा परिषदेची एक आणि पंचायत समितीच्या दोन जागा लढवल्या. यापैकी एका पंचायत समितीच्या जागेवर विजय मिळवला.

खानापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे एकमेव नेते बाबासाहेब मुळीक यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसशी युती केली. पण तालुक्यात `राष्ट्रवादी'ला एकही जागा मिळाली नाही.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतील पराभवानंतर आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील कार्यकर्ते खचलेले आहेत, या खचलेल्या कार्यकर्त्याना उभारी मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या राज्य कार्यकारणीत एखाद्याला संधी मिळेल असे वाटत होते. 

निसर्गाकडून जसा आटपाडी-खानापूरच्या वाटयाला दुष्काळ आला आहे, तसाच दुष्काळ या निवडीत आला आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे मेव्हणे हणमंतराव देशमुख, लोकनेते राजारामबापू पाटील यांचे सहकारी रावसाहेब पाटील, सादिक खाटीक, खानापूर तालुक्यातून बाबासाहेब मुळीक यांना प्रदेश कार्यकारणीत संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण आटपाडी, खानापूर संधीपासून वंचित राहिला आहे.
 

संबंधित लेख