Pune Municipal corporation : who will replace Chetan Tupe ? | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचा नवा गट नेता कोण ? 

ज्ञानेश सावंत 
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

चेतन तुपे यांना पूर्णवेळ संघटनेच्या कामात लक्ष घालता यावे, या उद्देशाने त्यांना गटनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी चालविलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आता पुन्हा खांदेपालट होणार आहे. महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद बदलण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला असून, त्यानुसार पक्षाच्या नव्या गटनेत्याच्या नावाचा फैसला मंगळवारी (ता.27) दुपारी होणार आहे. 

या पदावर आपली वर्णी लावण्यासाठी राष्ट्रवादीतील ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांनी 'फिल्डिंग' लावली आहे. माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बराटे, बाबुराव चांदरे, विशाल तांबे यांची नावे चर्चेत आहते.

तेव्हाच, माजी महापौर वैशाली बनकर, स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्‍विनी कदम, नगरसेविका नंदा लोणकर या महिला नेत्याही विरोधी पक्ष नेतेपदाच्या शर्यतीत उतरल्या आहेत. या पदावर नव्या नेत्याची निवड करून नव्या राजकीय गणितांची जुळवाजुळवा करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणातील प्रतिष्ठेच्या विरोधी पक्ष नेतेपद कोण पटकावणार, याची उत्सुकता आहे. 

महापालिकेत राष्ट्रवादीकडे दुसऱ्या क्रमाकांचे म्हणजे, 42 इतके संख्याबळ आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद या पक्षाकडे आहे. त्यानुसार गेल्या दीड वर्षांपासून चेतन तुपे यांच्याकडे या पदाची जबाबदारी आहे. त्यातच शहराध्यक्षपदही चेतन यांच्याकडेच सोपविण्यात आले आहे. महापालिकेसह शहराध्यक्ष म्हणून चेतन यांचे काम उजवे असले तरी, चेतन यांच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा नेतृत्वाचा इरादा आहे. तेव्हाच, चेतन यांच्याकडे प्रवक्तेपदही आहे. 

या पार्श्‍वभूमीवर चेतन यांना पूर्णवेळ संघटनेच्या कामात लक्ष घालता यावे, या उद्देशाने त्यांना गटनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. याचवेळी महापालिकेतही आक्रमक भूमिका घेऊन सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची पक्षाची व्यूहरचना आहे. त्यामुळे गटनेतेपदी अनुभवासोबतच अभ्यासू आणि आक्रमक नेत्याला संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे धनकवडे, बराटे, चांदेरे, तांबे यांनी मोर्चेबांधणी केली आहे. 

चेतन हे शहराध्यक्ष असल्याने त्यांना पुणे लोकसभा आणि आठ विधानसभा मतदारसंघात लक्ष घालावे लागेल. या काळात नेत्यांच्या सभा आणि कार्यक्रमांचे नियोजन त्यांच्याकडे राहणार आहे. त्यामुळे चेतन यांच्याकडील जबाबदारी कमी करीत असल्याचे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. याबाबत चेतन तुपे म्हणाले, "महापालिकेतील पक्षाचा गटनेता ठरविण्यासाठी मंगळवारी (ता.27) बैठक होईल. या बैठकीत नव्या गटनेत्याचे नाव निश्‍चित केल्यानंतर ते महापौरांना कळविण्यात येईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.''

संबंधित लेख