Pune Municipal corporation Genral body Tukaram Munde targetted | Sarkarnama

विद्यार्थी वाहतूक अनुदानावरून सर्वसाधारण सभेत तुकाराम मुंडे यांच्यावर टीका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

"संचालक मंडळ असताना एका व्यक्तीच्या लहरीनुसार दरवाढ कशी केली जाते', "मुंडे सभागृहासमोर येण्यास का कचरतात', "मुंडे नकारात्मक मानसिकतेने काम करतात,' अशा शब्दांत नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर टीका केली.

पुणे  :  विद्यार्थी वाहतुकीसाठी महापालिकेने पीएमपीला अनुदान द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत मंगळवारी गदारोळ केला.

या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पीएमपीच्या अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी सायंकाळी चार वाजता बैठक आयोजित केल्याची घोषणा केल्यावर सभेचे कामकाज सुरळीत झाले. 

सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहाबाहेर घोषणा देत धरणे आंदोलन केले. 

या आंदोलनात काही शालेय विद्यार्थ्यांनी गणवेश घालून सहभाग घेतला. सभेचे कामकाज सुरू झाल्यावर आबा बागूल यांनी विद्यार्थी वाहतुकीसाठी महापालिकेने तातडीने अनुदान जाहीर करावे, अशी मागणी लावून धरली. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी त्यांना साथ दिली. त्या वेळी महापौरांनी आयुक्त कुणाल कुमार यांना आंदोलकांशी चर्चा करण्यास सांगितले. 

त्यावर आक्षेप घेत आंदोलकांशी महापौरांनीच चर्चा करावी, अशी मागणी बागूल यांनी केली. महापौरांनी ही मागणी फेटाळल्यावर बागूल यांनी 11 वाजून 20 मिनिटांनी सभागृहात गणसंख्या नसल्याचे निदर्शनास आणून दिले आणि सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची विनंती केली; परंतु महापौरांनी त्यानंतर सुमारे 25 मिनिटांनी गणसंख्या मोजण्याचे नगरसचिवांना आदेश दिले. त्या वेळी गणसंख्या पुरेशी असल्याने सभागृहाचे कामकाज सुरू झाले.

 या वेळी बाबूराव चांदेरे म्हणाले, ""पीएमपीचे अध्यक्ष सभागृहात येऊन चर्चा करण्यास तयार नाहीत. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे दिसून येते. संचालक मंडळाला डावलून होणारी दरवाढ महापौर खपवून कसे घेतात. सत्ताधाऱ्यांनाच अधिकारी विचारत नसतील तर विरोधकांनी काय करायचे.''

या वेळी दत्तात्रेय धनकवडे, वैशाली बनकर, नंदा लोणकर, अविनाश बागवे, बापूराव कर्णे गुरुजी, सुभाष जगताप, योगेश ससाणे, गोपाळ चिंतल, वसंत मोरे, भोसले, तुपे यांनी चर्चेत भाग घेतला. त्याची दखल घेऊन महापौरांनी बुधवारी चार वाजता बैठक होणार असल्याचे जाहीर केल्यावर सभागृहातील गोंधळ आटोक्‍यात आला. 

"संचालक मंडळ असताना एका व्यक्तीच्या लहरीनुसार दरवाढ कशी केली जाते', "मुंडे सभागृहासमोर येण्यास का कचरतात', "मुंडे नकारात्मक मानसिकतेने काम करतात,' अशा शब्दांत नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर टीका केली.

दरम्यान, आयुक्त, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी मुंडे आणि अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

त्यानंतर संयुक्त बैठकीचा प्रस्ताव जाहीर झाला. पीएमपी आणि महापालिका पदाधिकाऱ्यांतील गैरसमज दूर करून बुधवारच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शिरोळे यांनी सांगितले. 

संबंधित लेख