pune municipal corporation | Sarkarnama

" भाजपकुमार ' आता भाजप नगरसेवकांच्याच रडारवर

उमेश घोंगडे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

महापालिका आयुक्त कुणालकुमार यांची बदली येत्या काही दिवसात अपेक्षित आहे. दिल्लीला बदली होण्याची शक्‍यता असल्याने त्यांचे डोळे दिल्लीकडे लागले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ते तक्रार करूनही लक्ष देत नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान कार्यालयात चांगले संबध असल्याने आयुक्त कुणाला जुमानत नाहीत, अशी एक भावना गेल्या काही महिन्यात नगरसेवकांमध्ये निर्माण झाली असून यातूनच सर्वसाधारण सभेत त्यांना लक्ष्य करण्यात आले. 
 

पुणे : महापालिका आयुक्त कुणालकुमार भारतीय जनता पक्षाला अनुकूल भूमिका घेतात असा आरोप गेली तीन वर्षे सलग त्यांच्यावर होत आहे. या नाराजीतून काहींनी त्यांचे भाजपकुमार असेही नामकरण केले होते. मात्र पालिकेत सत्ता बदल झाल्यानंतर सत्ताधारी भाजपच्या सदस्यांकडून कुमार यांना लक्ष्य करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांतील अनुभव तर तसाच आहे. 

महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पक्षाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी तुमचा भाटीया करू, असा थेट इशारा दिला. महापालिकेतील अंतर्गत बदल्यावरून सर्वसाधारण सभेत वातावरण पेटले असताना भाटीया करण्याचा इशारा देण्यात आला. 1998 साली आयुक्त असताना भाटीया यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता धडक काम सुरू केले होते. त्यांच्या अतिक्रमणविरोधी कारवाईची झळ साऱ्याच राजकारण्यांना बसली होती. 

तेव्हाच्या कॉंग्रेस सत्ताधाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत ठराव करून भाटीया यांना राज्य सरकारच्या सेवेत परत पाठविले होते. आम्ही सांगतो तसे करा अन्यथा तुमचा भाटीया करू, या इशाऱ्यामागे बदल्यांचे राजकारण आहे. महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक व सहायक आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्तांच्या पातळीवर झाल्या आहेत. या बदल्या नियमानुसार झाल्या नाहीत, असा आरोप नगरसेवकांकडून करण्यात येत आहेत. मात्र या बदल्या नियमानुसार झाल्याची प्रशासनाची भूमिका आहे. 

या संदर्भात तक्रार करूनही आयुक्त लक्ष देत नसल्याची नगरसेवकांची भावना झाली असून त्यातून सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेण्यात आल्याचे नगरसेवकांच्यावतीने सांगण्यात आले. महापालिका आयुक्त कुणालकुमार यांची बदली येत्या काही दिवसात अपेक्षित आहे. दिल्लीला बदली होण्याची शक्‍यता असल्याने त्यांचे डोळे दिल्लीकडे लागले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ते तक्रार करूनही लक्ष देत नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान कार्यालयात चांगले संबध असल्याने आयुक्त कुणाला जुमानत नाहीत, अशी एक भावना गेल्या काही महिन्यात नगरसेवकांमध्ये निर्माण झाली असून यातूनच सर्वसाधारण सभेत त्यांना लक्ष्य करण्यात आले. 
 

संबंधित लेख