महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुण्यात सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेविका एकत्र 

Pune-Municipal.
Pune-Municipal.

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधील नगरसेविका आणि पराभूत उमेदवार आता एकत्र येणार आहेत. त्याला निमित्त आहे, शिवजयंतीचे औचित्य साधून, महिलांच्या सुरक्षिततेचा नारा देण्यासाठी काढण्यात येणाऱ्या "मी सुरक्षित, माझे पुणे सुरक्षित' या "बाइक रॅली'चे. 

कोथरुड, कर्वेनगर आणि परिसरातील विविध राजकीय पक्षाच्या 15 नगरसेविका आणि अन्य उमेदवार रॅलीत सहभागी होऊन महिला अत्याचारविरोधात एकजुटीची वज्रमुठ करणार आहेत. राजकीय मतभेद बाजूला सारून नगरसेविका आणि महिला कार्यकर्त्या एवढ्या प्रमाणात एकत्र येणार असल्याने "बाइक रॅली' चर्चेचा विषय ठरला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, दीपाली धुमाळ यांच्यासह भाजपच्या वृषाली चौधरी, डॉ. श्रध्दा प्रभुणे, अल्पना वरपे, वासंती जाधव यांच्यासह बावधनच्या सरपंच पियुषा दगडे-पाटील, संगिता वेडे-पाटील, रुपाली चाकणकर रॅलीत सहभागी होणार आहेत. एवढेच नाहीत, या नगरसेविकांविरोधात निवडणूक लढविलेल्या महिला उमेदवारही रॅलीत उत्साहाने सहभागी होणार आहेत. 

शिवजयंतीनिमित्त संजीवनी महिला व बालविकास संस्थेच्या अध्यक्ष नंदिनी पानेकर यांच्या संकल्पनेतून ही बाइक रॅली काढण्यात येत आहे. कर्वेनगरातील कमिन्स कॉलेजपासून सोमवारी सकाळी अकरा वाजता निघाणाऱ्या रॅलीचा समारोप कोथरुड येथील शिवाजी पुतळ्याजवळ होईल. या "बाइक रॅली'ला खासदार अनिल शिरोळे आणि आमदार मेधा कुलकर्णी "हिरवा झेंडा' दाखविणार आहेत. 

पुणे शहर आणि आजूबाजूच्या गेल्या काळात महिला आणि युवतींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशा घटना रोखण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढण्याचा निर्धार संजिवनी संस्थेने केले आहे.

त्याची सुरवात म्हणून राजकीय क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रातील महिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांच्या प्रश्‍नात राजकारण येऊ नये म्हणून, बहुतांशी प्रभागांमधील सर्वच राजकीय पक्षाच्या महिलांना रॅलीत सहभागी होतील. यानिमित्ताने महिला एकजुटीचा संदेश देतील. असे पानेकर यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com