पुणे मेट्रो 2019 मध्ये धावणार , पहिली गाडी पिंपरीतून सुटणार
नागपूर मेट्रोची याच महिन्यात ट्रायल रन
महामेट्रोच काम करीत असलेल्या नागपूर मेट्रोचे काम अंतिम टप्यात आले असून या महिन्यात तेथे ट्राय़ल रन होईल, अशी माहिती श्री.दिक्षीत यांनी दिली.त्यामुळे मुंबईनंतर नागपूर हे मेट्रो सुरु होणारे राज्यातील दुसरे शहर ठरणार आहे.यानिमित्त राज्याच्या राजधानीनंतर उपराजधानीत मेट्रो सुरु होण्याचे औचित्यही पाळले जाणार आहे.त्यानंतर ती राज्याच्या शैक्षणिक राजधानीत सुरु होणार आहे.
पिंपरीः लालफितीसह राजकीय वादात सापडल्याने विलंब झालेल्या पुणे मेट्रोचे काम आता पळू लागल्याने 2021 मध्ये सुरु होणारी ही रेल्वे कुठला नवा राजकीय अडथळा आला नाही,तर दोन वर्षे अगोदरच म्हणजे 2019 मध्येच धावणार आहे.
त्याला हा प्रकल्प राबविणाऱ्या महामेट्रो रेल कॉर्पोरेशनने दुजोरा दिला आहे. दरम्यान, या मेट्रोच्या नावासह इतर आक्षेप व वाद राज्य व केंद्र सरकारची ही संयुक्त कंपनी दोन्ही सरकारच्या माध्यमातून सोडविणार असल्याने नागपूरप्रमाणेच पुणे मेट्रोही वेळेअगोदर होईल, असा विश्वास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे.
कंपनीचे कार्यालय आणि माहिती केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये (कासारवाडी) सुरु करून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात पिंपरीवर झालेला अन्याय दूर करण्याचा प्रयत्न आता केला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाला पिंपरीचा विरोध काहीसा मवाळ होऊन प्रकल्प वेळेत मार्गी लागेल, असे कंपनीचे अनुमान आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या या मेट्रोत दोन्ही शहरांच्या पालिकांनी समान आर्थिक भार उचललेला आहे. मात्र, पहिल्या टप्यात फक्त वीस टक्के पिंपरीचा भाग त्यात समाविष्ट होत असल्याने पिंपरी पालिकेने या प्रकल्पाला विरोध केलेला आहे. तो दूर करण्यासाठी मेट्रोचे काम करणाऱ्या महामेट्रोने या प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामकाज पिपरीतून सुरु केले आहे. पिंपरी-स्वारगेट या कॉरिडॉरचे काम पावसाळ्यातही जोरात असून नाशिकफाटा येथील पिलर पूर्ण झाला आहे.दुसरीकडे वनाज ते रामवाडी या पुण्यातील दुसऱ्या कॉरिडॉरचे सर्वेक्षणच चालू आहे.
त्यामुळे मेट्रोचा पिंपरी ते स्वारगेट हा मार्ग प्रथम पूर्ण होणार असून त्यावरच सहा डब्यांची (कोच) पहिली गाडी पिंपरीतून सुटणार आहे, असे श्री.दीक्षित यांनी सांगितले.या प्रकल्पाविषयी जनजागृतीच्या उद्देशातून पिंपरीतच मेट्रोचे माहिती केंद्र आणि कार्यालयही सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे भुमीपूजन झाले.त्यानंतर सहा महिन्यांनी प्रत्यक्ष काम सुरु झाले आहे.पाच वर्षात म्हणजे 2021 पर्यंत ते पूर्ण करायचे आहे.मात्र, हेच काम करीत असलेल्या महामेट्रो कंपनीचे नागपूर मेट्रोचे काम अंतिम टप्यात आहे.
21 ऑगस्ट 2014 ला मोदींच्याच हस्ते नागपूर मेट्रोचेही भूमीपूजन झाले. 31 मार्च 2015 ला त्याचे प्रत्यक्ष काम सुरु झाले. वेळेआधी ते पूर्ण झाले असून याच महिन्यात तेथे ट्रायल रन सुरु होणार आहे.त्याच वेगाने आता ते पुण्यातही काम करणार आहत.त्यामुळे येथील कामही दोन वर्षे अगोदर पूर्ण होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.