pune-junnar-bdo-corruption | Sarkarnama

लाचप्रकरणी जुन्नर बीडीओची पुणे झेडपी सिईओंकडून हकालपट्टी 

गजेंद्र बडे 
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

ग्रामसेविकेकडे पैशाची मागणी करणाऱ्या जुन्नरच्या गट विकास अधिकाऱ्याला (बीडीओ) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता. 25) चांगलाच धडा शिकविला आहे. याप्रकरणी मांढरे यांनी तेथील बीडीओ सतीश गाढवे यांचा पदभार तात्काळ काढून घेण्यात असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्यावतीने स्वतंत्रपणे गाढवे यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचा आदेशही मांढरे यांनी दिला आहे.

पुणे : ग्रामसेविकेकडे पैशाची मागणी करणाऱ्या जुन्नरच्या गट विकास अधिकाऱ्याला (बीडीओ) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता. 25) चांगलाच धडा शिकविला आहे. याप्रकरणी मांढरे यांनी तेथील बीडीओ सतीश गाढवे यांचा पदभार तात्काळ काढून घेण्यात असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्यावतीने स्वतंत्रपणे गाढवे यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचा आदेशही मांढरे यांनी दिला आहे.

लाचप्रकरणी एखाद्या बीडीओवर एवढ्या मोठ्या प्रमाणात तिहेरी पद्धतीने कारवाई होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे. यामुळे किमान यापुढे तरी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी चांगले काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

जुन्नरचे सहायक गट विकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे गाढवे यांच्याकडील बीडीओपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 95 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एखाद्या खातेप्रमुखांचा विशिष्ट कारणांवरून पदभार काढून घेण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे. त्या अधिकाराचा वापर करून गाढवे यांच्यावर ही तिहेरी कारवाई करण्यात आल्याचे सूरज मांढरे यांनी सांगितले. 

गाढवे यांच्याविरोधात जिल्हा परिषदेकडे विविध प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातच त्यांनी एका ग्रामसेविकेकडे भ्रमणध्वनीद्वारे पैशाची मागणी केल्याची घटना घडली होती. याबाबत गाढवे आणि सबंधित ग्रामसेविकेत झालेले भ्रमणध्वनी संभाषणही मांढरे यांना प्राप्त झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, याबाबत सखोल चौकशी करून 25 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश मांढरे यांनी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांना दिला होता. त्यानुसार घुले यांनी आज हा अहवाल सादर केला. अहवाल प्राप्त होताच, गाढवे यांच्यावर ही तात्काळ कारवाई करण्यात आली. 

सर्व बीडीओंना चांगल्या कामाचा सल्ला 
दरम्यान, या प्रकरणामुळे सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील सर्वच गट विकास अधिकाऱ्यांना चांगले काम करण्याचा सल्ला दिला आहे. याबाबतचे पत्रच सर्व बीडीओंना देणयात आले आहे. एका कठीण परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही सामान्य नागरिकापासून एक अधिकारी म्हणून नावारुपास येता. त्यामुळे ज्या पदाने आपल्याला वैभव दिले, त्या पदाचे पावित्र्य राखण्याचे आपले परम कर्तव्य आहे. पैशाच्या क्षणिक मोहापायी पदाची, आई-वडिलांची पर्यायाने घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवता, ही दुदैर्वी घटना आहे. मात्र जिल्ह्यात यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. याची जबर किंमत संबंधितांना मोजावी लागेल, असा इशाराही मांढरे यांनी जिल्ह्यातील सर्व बीडीओंना दिला आहे. 

संबंधित लेख