pune-girish-bapat-rajani-patil | Sarkarnama

बापटसाहेब, आमदारकीसाठी आबा बागूलांना सांगलीचा रस्ता का दाखविता?; माजी खासदार रजनी पाटील यांचा सवाल 

उमेश शेळके
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

`अहो बापट, सांगलीची मुलगी सून म्हणून तुम्ही पुण्यात आणता, मग आमदार होण्यासाठी आबा बागूलांना सांगलीचा रस्ता का दाखवता,' असा खुसखुशीत सवाल करीत कॉंग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना राजकीय चिमटा काढला. 

पुणे : `अहो बापट, सांगलीची मुलगी सून म्हणून तुम्ही पुण्यात आणता, मग आमदार होण्यासाठी आबा बागूलांना सांगलीचा रस्ता का दाखवता,' असा खुसखुशीत सवाल करीत कॉंग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना राजकीय चिमटा काढला. 

कॉंग्रेसचे पुण्यातील ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी नवरात्रानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजप आणि कॉंग्रेसच्या नेत्यांची जगुलबंदी आज रंगली.
 
नेहमीप्रमाणेचे आबा बागूल यांच्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आज शानदार उद्‌घाटन झाले. उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला स्टेजवर राजकीय नेत्यांची मोठी गर्दी जमली होती. त्या संधीचा फायदा राजकीय नेत्यांनी घेतला नाही, तर नवलच. तसेच झाले. आमदार विश्‍वजीत कदम यांनी भाषणात "आबा किती वर्ष महापालिकेचे काम करणार, आता आमदार होऊनच कार्यक्रम घ्या,' असे सांगत या विषयाला हात घातला. 

कदम यांच्या भाषणानंतर पालकमंत्री गिरीश बापट भाषणाला उभे राहिले. "आबावर माझे देखील मनातून प्रेम आहे. पण काय आहे, तो चांगले काम करतो, त्यामुळे मतदार म्हणतात, 27 वर्ष नाही, तर 57 वर्ष ते आमचे नगरसेवकच राहिले पाहिजे,' असे सांगून कदम यांच्याकडे बघून म्हणाले,' आम्हाला वाटले कदम पुण्यातून खासदार होतील, आमदार होतील, परंतु त्यांना ते जमले नाही. अखेर ते सांगलीला गेले. त्यांनी आबाला देखील सांगलीला घेऊन जावे, आम्ही त्याला विरोध करणार नाही,' असे सांगताच कार्यक्रमात हशा उसळला. 

बापटांनी मारलेली ही टिचकीला माजी खासदार रजनी पाटील यांनी जोरदार उत्तर दिले. त्या म्हणाल्या," बापटसाहेब तुम्ही सांगलीची सून करून पुण्यात आणता, मात्र आमच्या आबांना का सांगलीला पाठविता. ते पुण्यातच राहिली, त्यांना तुम्हीच मनातून आणि जाहीरही अशिर्वाद द्या. आबा तुम्ही देखील आता महापालिकेबरोबरच विधानसभेचेही काम सुरू करा.' 

त्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही संधी साधत बापट यांना मैत्री जपण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, "आबाला तुम्ही मित्र समजता, मग मित्रावर असा अन्याय का करता. तुम्ही नगरसेवकाचे मंत्री झालात, पालकमंत्री झालात, मित्रालाही आमदार करण्यासाठी मदत करा.'' 
 

संबंधित लेख