Pune Garbage Issue | Sarkarnama

कचरा आंदोलकांना राष्ट्रवादीच्या खासदारांची फूस - राज्यमंत्री शिवतारे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 मे 2017

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मी आज ग्रामस्थांशी चर्चेसाठी गेलो होतो. गेल्या 21 दिवसांपासून कचराप्रश्‍नी आंदोलन सुरू आहे. ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा झाली; परंतु काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण ग्रामस्थांच्या आंदोलनात सामील झाल्या होत्या. दोन्ही खासदार एकीकडे कचऱ्याच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेमध्ये सामील होतात आणि दुसरीकडे शहरात येऊन कचरा उचला, यासाठी आंदोलन करतात, हा दोन्ही खासदारांचा दुटप्पीपणा आहे.- विजय शिवतारे

पुणे - गेल्या 21 दिवसांपासून कचरा डेपो हटविण्यासाठी फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलकांना "राष्ट्रवादी'च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण या दोन्ही खासदारांची फूस असल्याचा आरोप जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी केला.

विधान भवन येथे कचराप्रश्‍नाच्या सद्यःस्थितीवर शिवतारे यांनी उपमहापौर नवनाथ कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पालिकेतील गटनेते चेतन तुपे, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची बैठक घेतली.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री शिवतारे म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मी आज ग्रामस्थांशी चर्चेसाठी गेलो होतो. गेल्या 21 दिवसांपासून कचराप्रश्‍नी आंदोलन सुरू आहे. ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा झाली; परंतु काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण ग्रामस्थांच्या आंदोलनात सामील झाल्या होत्या. दोन्ही खासदार एकीकडे कचऱ्याच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेमध्ये सामील होतात आणि दुसरीकडे शहरात येऊन कचरा उचला, यासाठी आंदोलन करतात, हा दोन्ही खासदारांचा दुटप्पीपणा आहे. पक्षीय राजकारण बंद करून सर्वांनी एकत्र बसून तोडगा काढावा. त्यांची आंदोलकांना फूस आहे हे उघड आहे. त्यामुळे पक्षीय राजकारण करून वेठीस धरणाऱ्यांना पुणेकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.''

या आरोपाबाबत 'राष्ट्रवादी'चे गटनेते नगरसेवक तुपे म्हणाले, ''पुणेकरांच्या वतीने स्थानिक खासदार म्हणून ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण गेल्या होत्या. त्यांच्यावरच राज्याचे मंत्री शिवतारे फूस लावल्याचा आरोप करीत आहेत, याचा मी निषेध करतो. मुळात शिवतारे यांचा मतदारसंघ असून हा प्रश्‍न त्यांच्याकडून सोडविला जात नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. त्यांनी श्रेयवाद बाजूला ठेवून कचराप्रश्‍न सोडवावा. पालकमंत्री आणि महापौर परदेश दौऱ्यावरून परत येईपर्यंत प्रश्‍न सोडवायचा नाही, असे दिसत आहे.''
 
सभागृह नेते भिमाले म्हणाले, ''महापालिकेच्या वतीने कचराप्रश्‍न सोडविण्यासाठी ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. शहरातील त्या त्या प्रभागांमध्ये 26 कचरा प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये पक्षीय राजकारण बाजूला ठेवून प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य द्यायला हवे.''

 

 

संबंधित लेख