Pune dadoji konddev Bramhan Mahasangh sambhaji Brigade | Sarkarnama

दादोजी कोंडदेव यांचा फोटो लावण्यावरून ब्राम्हण महासंघ आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यात बाचाबाची

अश्विनी जाधव केदारी 
बुधवार, 7 मार्च 2018

पुणे : महापालिका आवारात दादोजी कोंडदेव यांचा फोटो लावण्यावरून ब्राम्हण महासंघ आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली आहे . ही घटना बुधवारी सकाळी घडली  . अखेर ब्राम्हण महासंघाने दादोजी कोंडदेव यांचा फोटो काढून नेला . 

पुणे : महापालिका आवारात दादोजी कोंडदेव यांचा फोटो लावण्यावरून ब्राम्हण महासंघ आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली आहे . ही घटना बुधवारी सकाळी घडली  . अखेर ब्राम्हण महासंघाने दादोजी कोंडदेव यांचा फोटो काढून नेला . 

आज दादोजी कोंडदेव यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी  महापालिका आवारात  दादोजी कोंडदेव यांचा फोटो लावून पूजन करणार असल्याचे कालच जाहीर केले होते . त्यानुसार ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे आणि काही कार्यकर्ते महापालिका आवारात सकाळी नऊच्या सुमारास दाखल झाले . त्यांनी महापालिकेच्या आवारात प्रवेश केल्यावर उजव्या हातास असलेल्या एका चौथऱ्यावर खुर्ची टाकून त्यावर  दादोजी कोंडदेव यांचा फोटो लावला  आणि या फोटोचे पूजन केले . 

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते महापालिका आवारात  दाखल झाले . दोन्ही बाजू आमने सामने येताच शाब्दिक चकमक उडून बाचाबाची झाली . प्रविण  धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत दादोजी कोंडदेव यांचा फोटो त्वरित हटविण्याची मागणी केली . थोड्यावेळाने ब्राम्हण महासंघाने दादोजी कोंडदेव यांचा फोटो महापालिकेच्या आवारातून  काढून बाहेर नेला . त्यानंतर तणाव निवळला . 

संभाजी ब्रिगेडचे प्रविण  धुमाळ म्हणाले , " हे दादोजी कोंडदेवाचा फोटो लावणारे काय महापालिकेचे जावई आहेत का ? ते विना परवानगी महापालिका आवारात प्रतिमा पूजन कसे करू शकतात ? हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे . यांचे गल्ली ते दिल्ली राज्य असल्याने त्यांची हिम्मत वाढली आहे . आमदार मेधा कुलकर्णी आणि महापौर मुक्ता टिळक यांचा या प्रकाराला छुपा पाठिंबा आहे . त्यांनी फोटो काढला नसता तर आम्ही फोटो काढून टाकला असता . " 

लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविल्यानंतर महापालिकेकडून मिळालेले आश्वासन पूर्ण न झाल्याने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून महापालिकेच्या आवारात दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचे पूजन केले ,असा दावा ब्राम्हण महासंघाचे आनंद  दवे यांनी केला . ते म्हणाले , " कारण आपले हे शहर सुद्धा इतर राज्याप्रमाणे पुतळे तोडणारे शहर म्हणून कुप्रसिद्ध न राहता येथे पुतळे परत लावणारे सुद्धा आहेत  ,हे पण देशाला दाखवण्याचा हा प्रयत्न आहे .  गेली अनेक वर्षे सतत मागण्या ,विनंती करूनही ना नगरपालिकेला जाग आली ना सरकार ला . पण आज आम्ही हे  काम केले. आम्हाला एक तास प्रतिमेचे पूजन करायचे होते त्यासाठी परवानगीची गरज नव्हती . पूजन झाल्यावर आम्ही हा फोटो काढून घेतला आहे .  " 

 

 

संबंधित लेख