pune court, cm speech | Sarkarnama

"राज्यातील न्यायालयांमध्ये चांगल्या सुविधा पुरविणार' 

sarkarnama
रविवार, 13 ऑगस्ट 2017

पुणे : राज्यातील न्यायालयांच्या इमारतींमध्ये आवश्‍यक त्या सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

पुणे : राज्यातील न्यायालयांच्या इमारतींमध्ये आवश्‍यक त्या सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

येथील कौटुंबिक न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ.श्रीमती मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले. कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती एस.एस.सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. श्रीमती रेवती मोहिते -डेरे, न्यायमूर्ती भूषण गवई, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्‍ता टिळक, विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

फडणवीस म्हणाले, देशातील आदर्श कौटुंबिक न्यायालय पुणे येथे झाले आहे. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल तर कार्यक्षमतेवर चांगला परिणाम होतो. त्यासाठी न्यायालयांमध्ये चांगल्या सुविधा आवश्‍यक आहेत. राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये आवश्‍यक त्या चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू. 

समाजातील एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्‍त करुन मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी एकत्र कुटुंब पध्दती होती, घरांतील ज्येष्ठ सदस्यांच्या मध्यस्थीमुळे पती-पत्नीतील वाद संपुष्टात यायचे. बदलत्या जीवनशैलीमुळे कौटुंबिक वादाचे प्रमाण वाढत आहेत. या न्यायालयात येणाऱ्या व्यक्‍ती निराश, कौटुंबिक कलहामुळे जीवनावरील विश्‍वास उडालेल्या असतात. येथील वातावरणामुळे त्यांना संवादासाठी वेळ मिळेल आणि घटस्फोटासाठी आलेल्या व्यक्ती परत आनंदात एकत्र जातील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. 

संबंधित लेख