पुणे शहराचे अध्यक्ष कोण ठरविणार? काँग्रेस पक्ष की सोशल मिडियावरचा 'पोल'

पुणे शहराचे अध्यक्ष कोण ठरविणार? काँग्रेस पक्ष की सोशल मिडियावरचा 'पोल'

पुणे - पुणे शहर काँग्रेसमध्ये सध्या अस्वस्थता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून एकंदरच काँग्रेस पक्षाला 'बुरे दिन' आले आहेत. पुणे शहराची काँग्रेसही त्याला अपवाद ठरलेली नाही. याच स्थितीत आता पुणे शहर काँग्रेसचा अध्यक्ष कोण असावा यासाठी 'सोशल मिडिया' वरुन एक 'पोल' व्हायरल झाला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अनिल शिरोळे तीन लाखांच्या फरकाने विजयी झाले. त्यापूर्वी पुणे शहर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. कै. विठ्ठलराव गाडगीळ पुण्याचे खासदार असताना महापालिकेत 123 पैकी 86 नगरसेवक काँग्रेसचे होते. ही संख्या 86 वरुन 64, नंतर 64 वरुन 38, पुढच्या निवडणुकीत 38 वरुन 28 आणि नंतर गेल्या निवडणुकीत थेट 9 पर्यंत घसरली. विधानसभेच्या निवडणुकीत शहरातल्या 8 जागांपैकी एकाही जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला नाही.

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने माजी मंत्री डाॅ. पतंगराव कदम यांचे चिरंजीव व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डाॅ. विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली होती. या उमेदवारीवरुन पुण्यातले जुने काँग्रेसजन नाराज होते. पुढच्या काळातही विश्वजित कदम आणि सध्याचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्याबाबत या जुन्या निष्ठावंतांचा नाराजीचा सूर आहे.

बागवे यांच्या या नाराजीपोटी या जुन्या निष्ठावंतांनी प्रदेश काँग्रेसकडे अनेक पत्रे पाठवली आहेत. आता अचानक काही मंडळी काँग्रेसचा शहर अध्यक्ष कोण असावा, याच्या शोधाला लागली आहेत. या मंडळींनी एका 'पोल' वेबसाईटवरुन चक्क शहराचा अध्यक्ष कोण असावा, याबद्दल मतदान घ्यायला सुरुवात केली आहे. हा आॅनलाईन पोल सध्या सोशल मिडियावरुन व्हायरल झाला आहे.

पुणे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष कोण पाहिजे? असा प्रश्न या 'पोल'मध्ये विचारण्यात आला आहे. खाली रमेश बागवे, अरविंद शिंदे, अभय छाजेड आणि मोहन जोशी असे चार पर्याय देण्यात आले आहे. हा पोल फेसबुकवरुन फिरत आहे. पोलचा अंतीम निकाल आल्यावर त्याचे काय करणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. सध्यातरी या चारही पर्यायांचे समर्थक आपापल्या परीने हा पोल व्हायरल करत, आपल्याच माणसाचे नांव अग्रकमावर यावे, यासाठी प्रयत्न करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com