pune city | Sarkarnama

पुण्यातील कचराकोंडी फुटली

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 मे 2017

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर पुण्यातील कचराकोंडी आज फुटली. फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील ग्रामस्थांच्या मागण्यांवर महिनाभरात निर्णय घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी पुण्यातील कचरा त्यांच्या हद्दीतील डेपोत टाकण्यास परवानगी दिली. त्यामुळे पुण्यातील कचरा उचलून तो डेपोत टाकण्याचा मार्ग खुला झाला आहे. 

बिबवेवाडी येथील क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या बैठकीला फडणवीस, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे, महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी आदी उपस्थित होते. कचरा डेपोमुळे बाधित झालेल्या 65 जणांना एक महिन्याच्या आता पुणे महापालिकेमध्ये नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच ग्रामस्थांच्या वापरात नसलेल्या जमिनी परत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली. हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आराखडा तयार करावा लागेल, त्यासाठी एक महिन्यात योजना करण्याचा प्रस्ताव दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आला. 
ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास मनाई केल्याने गेली 23 दिवस शहरातील कचरा उचलला जात नव्हता. त्यामुळे कचऱ्याचे ढीग शहरभर साचले होते. पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक या कालावधीत परदेश दौऱ्यावर असल्याने यावर राजकीय पक्षांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. राजकीय पक्षांनी यावर आंदोलन केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांत यावर मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. 
आता महिनाभराचा कालावधी महापालिकेला मिळाला आहे. यामुळे तातडीने ग्रामस्थांच्या मागण्यांना प्रतिसाद प्रशासनाला द्यावा लागणार आहे. येथील कचरा टाकणे बंद करण्यासाठी वॉर्डनिहाय कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था पालिकेला करावी लागणार आहे. याबाबत आता पालिका काय करणार, याकडे आता लक्ष आहे. 

संबंधित लेख