pune bjp yogesh mulik | Sarkarnama

पुणे भाजपमध्ये अखेर घराणेशाहीच ठरली श्रेष्ठ

उमेश घोंगडे 
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे : पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अखेर आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांची निवड निश्‍चित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुळीक यांचे नाव निश्‍चित केल्यानंतर आज दुपारी मुळीक यांनी अर्ज भरला. येत्या सात मार्चला मुळीक यांच्या नावाची औपचारिक घोषणा होईल.

मुळीक यांच्या उमेदवारीने भारतीय जनता पक्षातील घराणेशाहीवर शिक्कामोर्तब झाले असून पक्षाची वाटचाल कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा वाईट पद्धतीने सुरू असल्याची तिखट प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 

सलग पाचवेळा नगरसेवकपदी निवडून आलेल्या सुनील कांबळे यांना दुसऱ्यांदा डावलण्यात आल्याने दलित-मातंग समाजाचा रोष पक्षाला सहन करावा लागेल, असे सांगण्यात येत आहे. गेल्यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी तर यावेळी योगेश मुळीक यांच्यासाठी कांबळे यांना दूर ठेवण्यात आले. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या रूपाने महापालिकेच्या खजिन्याच्या किल्ल्या कुणाच्या हाती लागणार याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून वाढली होती. योगेश मुळीक तसेच आमदार योगेश टिळेकर यांच्या मातु:श्री रंजना टिळेकर यांची नावे चर्चेत होती.

मात्र गेल्यावर्षी डावलण्यात आलेल्या सुनील कांबळे यांना यावेळी तरी संधी मिळणार का याची चर्चादेखील जोरात होती. सुनील कांबळे हे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू असले तरी नगरसेवकपदाची ही त्यांची पाचवी टर्म आहे. दिलीप कांबळे यांच्या आधीपासून ते महापालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. दोन्ही आमदारांनी आपले बंधू व आईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

अशावेळी स्वकर्तृत्वाने राजकारणात स्थिर झालेल्या कांबळे यांना संधी मिळायला हवी होती अशी पक्षातील बहुसंख्य कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे भारतीय जनता पक्षातही वशिलाच श्रेष्ठ ठरल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. या स्पर्धेत सिंहगड रस्ता भागातील नगरसेविका मंजुषा नागपुरे व नगरसेविका निलीमा खाडे यांचेदेखील नाव चर्चेत होते. 

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून जगदीश मुळीक निवडून आले आहेत. या मतदारसंघावरील पकड मजबूत करण्यासाठी योगेश यांना स्थायी समितीवर संधी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यामुळे सुनील कांबळे यांच्यासारख्या पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

टिळेकर यांच्या मातु:श्री रंजना टिळेकर व योगेश मुळीक यांची निवड स्थायी समितीच्या सदस्यपदी अचानक झाली. त्यावेळीच स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची कांबळे यांची संधी हुकणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र दलित-मातंगांचे प्रतिनिधी म्हणून कांबळे यांना संधी मिळेल. शिवाय गेल्यावेळीदेखील त्यांना थांबयण्यात आले होते. त्याचाही विचार होईल, असे वाटत होते, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 
----- 

संबंधित लेख