pune-agrowon-sarpanch-parishad | Sarkarnama

सरपंचांचा मान आणि मानधन वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री फडणवीस

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

“कृषिकेंद्रित ग्रामविकासाला चालना देण्याची ताकद सरपंचांमध्येच आहे. गावाच्या समृद्धीसाठी शिव्या खाण्याचीदेखील तयारी तुम्ही ठेवा. गाव सुधारण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी उभे राहील. राज्यातील सरपंचांचा मान आणि मानधन वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

पुणे : “कृषिकेंद्रित ग्रामविकासाला चालना देण्याची ताकद सरपंचांमध्येच आहे. गावाच्या समृद्धीसाठी शिव्या खाण्याचीदेखील तयारी तुम्ही ठेवा. गाव सुधारण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी उभे राहील. राज्यातील सरपंचांचा मान आणि मानधन वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

श्रीक्षेत्र आळंदीत ‘सकाळ अॅग्रोवन'च्या आठव्या सरपंच महापरिषदेचे उदघाटन शनिवारी (ता.२४) करताना मुख्यमंत्री बोलत होते. या शानदार सोहळ्यात सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, फोर्स मोटर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप धाडीवाल, `सकाळ'चे संचालक संपादक श्रीराम पवार, ‘अॅग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण व्यासपीठावर होते. 

सरपंच महापरिषदेचे मुख्य प्रायोजक फोर्स मोटर्स लि., पॉवर्ड बाय जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., प्रायोजक सोनाई पशू आहार, मारुती सुझुकी इंडिया लि., बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., विक्रम टी, डॉलिन - सिडलर इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा बायोसिस्टिम्स प्रा. लि., राज्य जलसंधारण विभाग, रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आहेत. या ग्रामकुंभात राज्यभरातील निवडक उच्चशिक्षित, युवा सरपंच तसेच महिला सरपंचांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी प्रदर्शन तसेच व्याख्यानांना हजेरी लावत ग्रामविकासाची शिदोरी गोळा केली. 

शिव्या खाल्ल्याने भोके पडत नाहीत 
“गावांच्या विकासाशिवाय देश घडणार नाही. ग्रामसमृध्दीच्या स्त्रोत बळकटीसाठी केंद्र व राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. ग्रामविकासात सरपंचांची भूमिका मध्यवर्ती आहे. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने मी मानधनाची घोषणा करणार नाही. मात्र, सरपंचांना ‘मान’ आणि ‘मानधन’देखील मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक राहील,” असे स्पष्ट करीत श्री. फडणवीस म्हणाले की, “सरपंचाने स्वस्थ बसल्यास गावाचा विकास होणार नाही. मुख्यमंत्री म्हणून मी शिव्या खातो. तुम्हीही त्याची तयारी ठेवा. लोकांनी शिव्या दिल्याने अंगाला भोकं पडत नाहीत. मात्र, त्यातूनच विकासाला चालना मिळते.” 

“केवळ सरपंच आणि ग्रामपंचायतींच्या निर्धारामुळे महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला. त्यामुळे आता २०२१ पर्यंत महाराष्ट्र बेघरमुक्त करण्यासाठी मला सरपंचांची मदत हवी आहे. पुढील काही दिवसांत आम्ही शेतीला सोलर फिडरच्या माध्यमातून दिवसा बारा तास अखंडीत वीजपुरवठा करू. इंटरनेटच्या माध्यमातून २६ हजार गावे १०० टक्के डिजिटल केली जातील. ऑनलाईन तंत्रामुळे जनतेला पारदर्शक सेवा मिळतील. मंत्रालयाचा कारभार गावागावांत पोचावा असा आमचा प्रयत्न आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले. 

शेतकरी विकासाचा ध्यास : प्रतापराव पवार 
सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार म्हणाले की, सरपंच महापरिषद, तनिष्का तसेच सकाळच्या अनेक उपक्रमांमधून राज्यात असंख्य सामाजिक कामे होत आहेत. सामाजिक सुधारणा हीच आमची धारणा आहे. पाच वर्षांत सहाशे गावे आम्ही टंचाईमुक्त केली आहे. टाटा, गुगल व तानिष्काच्या माध्यमातून चार लाख ७५ हजार महिलांना इंटरनेट प्रशिक्षण दिले. शेतकऱ्यांचा विकास कसा होईल, याचा ध्यास घेतलेले आमचे अॅग्रोवन हे वर्तमानपत्र शेतीमध्ये परिवर्तन आणते आहे. 

फोर्स मोटर्सचा सहभाग आनंददायी : प्रदीप धाडीवाल 
राज्यातील सरपंचांचे व्यासपीठ बनलेल्या सरपंच महापरिषदेचे मुख्य प्रायोजकपद सलग आठ वर्षांपासून फोर्स मोटर्सकडे असल्याचा आनंद आम्हाला आहे, असे उद्गार फोर्स मोटर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष उपाध्यक्ष प्रदीप धाडीवाल यांनी काढले. उन्नत शेती व समृध्द शेतकरी संकल्पनेसाठी फोर्सने तीन नवे ट्रॅक्टर आणले आहेत. आळंदीत माउलीचा आशीर्वाद आणि कृषिकेंद्रित ग्रामविकासाचा हा प्रसाद सरपंचांना मिळतो आहे, असेही ते म्हणाले. 

पाणी विद्यापीठाची उभारणी सुरू : अतुल जैन 
“कै. भँवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून शेतीत पाण्याच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी संशोधन करणारे पाणी विद्यापीठ जळगावला उभारले जात आहे, असे जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी घोषित केले. सरपंच हे गावाचे आयडॉल आहेत. त्यांनी दुष्काळमुक्ती, पाणीबचत, शाश्वत शेती या उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा. शेतक-यांची जोखीम कमी करण्यासाठी आम्हीदेखील ठिबक तंत्राच्या सहायाने तुमच्याबरोबर काम करू, असे श्री. जैन म्हणाले. 

बिंटू भोईटे ठरले ट्रॅक्टरचे मानकरी 
अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले की, फोर्सचा ट्रॅक्टर तसेच विक्रम टीच्या वतीने दिल्या जाणा-या सॅनिटरी व्हेंडिंग मशीनची सोडत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. खरे तर सरपंच परिषदेत मानधन वाढीची घोषणा आणि ट्रॅक्टर सोडत अशा दोन्ही गोष्टी सरपंचांच्या जिव्हाळ्याच्या असतात. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काढलेल्या सोडतीत सरपंच रामेश्वर गजानन परभणे (भेंडाळे, औरंगाबाद) व्हेंडिंग मशीन तर 
सरपंच बिंटू पंढरीनाथ भोईटे ( हिवरखेडे, चांदवड, जि. नाशिक) ट्रॅक्टरचे विजेते ठरले. 

सरपंच महापरिषद हे उत्कृष्ट व्यासपीठ 
“सरपंच महापरिषदेच्या माध्यमातून राज्यातील सरपंचांना अतिशय चांगले व्यासपीठ सकाळ माध्यम समूहाने दिले आहे. त्यातून संवाद, प्रशिक्षण, अभिसरण होते. सरपंचांच्या मनातील संकल्पना पूर्ण करण्यासाठी रस्ता दाखविणारा हा उपक्रम आहे. २८ हजार सरपंचांमधून तुमची निवड होते, म्हणजे तुम्ही चांगले काम केले आहे असे समजावे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सकाळ अॅग्रोवनच्या महापरिषदेचे कौतुक केले. 

दुष्काळात सरकार शेतक-यांच्या पाठीशी 
राज्याच्या २६ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे. पण, शेतक-यांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे आहे. साडेतीन वर्षांत आम्ही दुष्काळ, बोंडअळी व इतर मदतीपोटी ४८ हजार कोटी शेतक-याच्या खात्यांत जमा केले आहेत. त्या आधी १५ वर्षांत दहा हजार कोटीदेखील जमा झाले नव्हते. 

मुख्यमंत्र्यांनी सरपंचांना दिलेल्या टिप्स 

  • राजकीय तडजोडी होतात, पण विकासाचे शाश्वत मूल्य सोडू नका 
  • कोणतीही संकल्पना गावावर न लादता त्यासाठी एक तर तुम्ही बदला किंवा लोकांना बदला 
  • सरकारी योजना वाईट नसते. राबविणारे चांगले किंवा वाईट असतात. तुम्ही अभ्यासू व चांगले बना 
  • सर्व सरकारी योजना एकदा वाचून काढा. त्यातून गावविकासाला चालना मिळेल. 
  • गावात जलसंधारण, कमी खर्चाची शेती, ठिबक संचाला प्रोत्साहन द्या. 
  • दुष्काळाशी सामना करण्यासाठी विविध सरकारी योजनांचा फायदा घ्या 
     

संबंधित लेख