PSI suspended for molesting lady constable | Sarkarnama

महिला कॉन्स्टेबलचा लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिस उपनिरीक्षक अमित शेलार निलंबित

सरकारनामा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

महिला पोलिस शिपायावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमित शेलार याच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी शेलार याला सेवेतून निलंबित केले आहे

नवी मुंबई  : महिला पोलिस शिपायावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमित शेलार याच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी शेलार याला सेवेतून निलंबित केले आहे.

तक्रारदार महिला पोलिस शिपाई नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. गत आठवड्यात या महिला पोलिसाने गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या शेलार यांच्याविरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे.

शेलार याने मार्च 2017 मध्ये घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये गुंगीचे औषध असलेला फळांचा रस दिला होता. त्यानंतर कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार या महिला पोलिसाने केली होती. त्यानंतर त्याने लैंगिक अत्याचाराचे मोबाईलवरून चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही संबंधित महिला पोलिसाने आपल्या तक्रारीत केला आहे.

पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शेलार याला सेवेतून निलंबित केले आहे.

संबंधित लेख