PSI Laxmi sapkale success story | Sarkarnama

...आणि पोलीस दलामध्ये उपनिरीक्षक झालेल्या 'लक्ष्मी'ला झाले अश्रू अनावर !

नरेश हाळनोर
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकणारे वडील अन संसाराला हातभार लागावा म्हणून धुणीभांडी करणारी आई. यांनी मुलींच्या जन्माने उदास न होता, तिघींना शिकविले.

लक्ष्मी सपकाळे ठरली सर्वोत्कृष्ठ महिला प्रशिक्षणार्थी

नाशिक : मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकणारे वडील अन संसाराला हातभार लागावा म्हणून धुणीभांडी करणारी आई. यांनी मुलींच्या जन्माने उदास न होता, तिघींना शिकविले. पैकी दोघी पोलीस दलात भरती झाल्या. मात्र लक्ष्मी हिने आपल्या मायबापाचे ऋण फेडत पोलीस दलामध्ये उपनिरीक्षक होण्याचा सन्मान तर पटकावलाच, शिवाय सर्वोत्कृष्ठ महिला प्रशिक्षणार्थी म्हणून पारितोषिकही घेतले. त्यावेळी तिच्या आई-वडलांसह लक्ष्मी सपकाळे यांनाही अश्रू अनावर झाले. 

एक नव्हे तर तीन मुली जन्माला आल्या म्हणून आमच्या आई-बाबांनी कधीही दु:ख व्यक्त केले नाही. उलट शिक्षणासाठी नेहमीच प्रेरणा दिली. ठाणे शहर पोलीस दलात 2008 मध्ये भरती झाल्यानंतरही बाबांनी नेहमीच शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे नोकरी आणि दुसरीकडे संसार असे दुहेरी जबाबदारी सांभाळत असताना बीए.ऍग्रीचे शिक्षण पूर्ण केले आणि आता एलएलबीचे शिक्षण सुरू आहे. 

इथपर्यंतचा प्रवास फक्त आईबाबांच्यामुळेच झाल्याचे लक्ष्मी सपकाळे या सांगत होत्या. जळगावातील पिंप्राळा येथील सुरेश जैननगरमध्ये सपकाळे कुटूंबिय राहतात. गौतम सपकाळे यांना पंचशिला, लक्ष्मी, शितल या तीन मुली व सिद्धार्थ हा मुलगा आहे.

लक्ष्मीच्या आई कल्पना सपकाळे या आज खुपच भावूक झाल्या होत्या. कोणत्याही आईची ओळख तिच्या मुलामुलींमुळे व्हावी अशीच अपेक्षा होती, ती आज लक्ष्मीने करून दिली. लक्ष्मी ही लक्ष्मीच राहिली असती तर धुणीभांडी करणाऱ्याची लक्ष्मी म्हटले असते. मात्र आज मला लक्ष्मीची आई म्हणून समाज ओळखेल हीच आमच्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे असे त्या सांगत होत्या, त्यावेळी सपकाळे दाम्पत्यांच्या नयनातून आनंदाश्रू ओघळत होते. 
 

संबंधित लेख