Prosecute Bhide on three more charges | Sarkarnama

आणखी तीन कायद्यांतर्गत संभाजी भिंडेंवर गुन्हे दाखल करा - अंनिसची मागणी 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुण्यातील माहिती अधिकाराचे कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला. जाहीरपणे मुलाबद्दल दावे करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. गेल्या दहा वर्षांपूर्वी भावनगर-गुजरातमध्ये पार्वती माँकडे मुलांसाठी रीघ लागली होती. त्याबद्दल बऱ्याच तक्रारी करण्यात आल्या होत्या - अविनाश पाटील

नाशिक : आंबा खाल्ल्याने मुले होतात, असा दावा करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पण निदान आणि उपचारासंबंधी वक्तव्य केले असल्याने त्यांच्याविरुद्ध चमत्कारी उपचारी दावा, वैद्यकीय उपचार आणि बोगस डॉक्‍टर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल व्हायला हवेत. भिडे यांच्या प्रकरणात सरकारने अॅड. उदय वारुंजीकर यांची नेमणूक करावी, अशा मागण्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी येथे केल्या.

सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यासंबंधाने नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर क्रांतिवीर वसंतराव नाईक तंत्रशिक्षण विद्यालयात झाले. त्यानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, की पुण्यातील माहिती अधिकाराचे कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला. जाहीरपणे मुलाबद्दल दावे करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. गेल्या दहा वर्षांपूर्वी भावनगर-गुजरातमध्ये पार्वती माँकडे मुलांसाठी रीघ लागली होती. त्याबद्दल बऱ्याच तक्रारी करण्यात आल्या होत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अटक का होत नाही?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 20 ऑगस्टला पाच वर्षे होतील. कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांचाही खून करण्यात आला आहे. पण विचारांचा प्रतिवाद विचाराने करता येत नसल्याने खून करण्याचा कट रचणारे, फरारी असणारे यांना अटक होत नाही. सनातन संस्था, हिंदू जनजागरण समिती, श्रीराम सेना पदाधिकारी यांचा सहभाग आहे. मात्र सनातन संस्थेचे डॉ. जयंत आठवले यांच्याविरुद्ध कारवाई होत नाही. पनवेलच्या आश्रमात नशेची औषधे, कंडोम सापडले. पण कारवाई होत नाही. त्यामुळे 20 जुलैपासून 20 ऑगस्टपर्यंत जवाब दो आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असलेले राज्य आणि केंद्र सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसून बैठक घेतो म्हणतात पण बैठक होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटण्याची वेळ देत नाहीत. कायदा व सुव्यवस्थेसंबंधी प्रश्‍न विचारण्याची विनंती सर्व खासदारांना करण्यात आली आहे. सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा देशात लागू व्हावा, वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणात यावा, अशी विनंती खासदारांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.
-अविनाश पाटील, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख