Pro Vidarbha Leaders aggressive against BJP | Sarkarnama

विदर्भवादी भाजपच्या विरोधात आक्रमक 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 23 जुलै 2018

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भवाद्यांना 'उचक्के' म्हटल्याने विदर्भवादी चांगलेच नाराज झाले आहेत. गडकरींच्या सभेत विदर्भवाद्यांनी "विदर्भाबद्दल बोला' असा आग्रह केला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल उपस्थित होते.

नागपूर : विदर्भवादी कार्यकर्ते आता भाजपच्या विरोधात उघडपणे भूमिका घेऊ लागले आहेत. भाजपच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय विदर्भ राज्य आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

1997 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव संमत केला होता. यामुळे विदर्भवादी नेते व मतदार भाजपच्या अधिक जवळ गेले होते. आमदार डॉ. अनिल बोंडे सारखे विदर्भवादी नेते भाजपमध्ये दाखल झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षात असताना सत्तेत आल्यानंतर विदर्भ करू, असे 100 रुपयांच्या स्टॅंप पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विदर्भासाठी कोणतीही किंमत चुकवायला तयार असल्याचा शब्द विदर्भवाद्यांना दिला होता. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मात्र विदर्भ राज्य करण्याच्यादृष्टीने कोणतीही पावले उचलली गेली नाही. याउलट विदर्भाच्या चळवळीच्या नेत्यांना सभेतून हाकलून लावण्याचे प्रकार होऊ लागले आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भवाद्यांना 'उचक्के' म्हटल्याने विदर्भवादी चांगलेच नाराज झाले आहेत. गडकरींच्या सभेत विदर्भवाद्यांनी "विदर्भाबद्दल बोला' असा आग्रह केला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल उपस्थित होते. अचानकपणे विदर्भवादी उठून विदर्भ राज्याची मागणी करू लागल्याने गोंधळा उडाला होता. असे 'उचक्के' सभेत राहतात, असे म्हणत विदर्भवाद्यांवर तोंडसुख घेतले होते.

विदर्भ राज्य आघाडीच्या सभेत गडकरींच्या या वक्तव्याचा निषेध केला असून गडकरी यांचा दृष्टीकोन लोकशाही विरोधी असल्याचा दावा विदर्भ राज्य आघाडीचे नेते राम नेवले यांनी केला आहे. विदर्भ राज्याचा ठराव केल्याने विदर्भवाद्यांना भाजपबद्दल ममत्व होते परंतु सध्या भाजपच्या नेत्यांचे विचार ऐकून हे पुतनामावशीचे प्रेम होते, हे स्पष्ट झाल्याचा आरोप राम नेवले यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. भाजपच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 

संबंधित लेख