प्रिया दत्त यांच्या जागी काॅंग्रेसकडून अभिनेत्री नगमाला संधी?

प्रिया दत्त यांच्या जागी काॅंग्रेसकडून अभिनेत्री नगमाला संधी?

मुंबई : उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार प्रिया दत्त या आगामी लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे समजते. त्यामुळे कॉंंग्रेसतर्फे या मतदारसंघातूून भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि ज्येष्ठ चित्रपट अभिनेते राज बब्बर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र प्रमुख दावेदार म्हणून अभिनेत्री नगमा यांचे नाव आघाडीवर आहे. या मतदार संघात विद्यमान खासदार आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजन या दुसऱ्यांदा कॉंग्रेसला टक्कर देण्यासाठी सिध्द झाल्या आहेत. 

आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांना पुन्हा त्यांच्याच मतदारसंघात उमेदवारी देण्याच्या सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र प्रिया दत्त यावेळी निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचे समजते. गेल्या दोन वर्षांपासून त्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रीय नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या त्या सहसचिव होत्या. तेथेही त्या सक्रीय राहल्या नाहीत.

मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरूपम यांची नियुक्ती झाल्यापासून प्रिया दत्त या पक्षातून दूर राहिल्या असल्याची चर्चा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्या पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाल्या नसल्याने कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.

या मतदारसंघावर सुनील दत्त यांचे 1984 पासून वर्चस्व होते. ते पाच वेळा येथून निवडून आले होते. भारत पाकिस्तान युध्दाच्या काळात सीमेवर लढणाऱ्या जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांनी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम केले होते. ऐंशीच्या काळात पंजामध्ये खलिस्तानी दहशतवाद सुरू असताना त्यांनी सद्भावना यात्रा काढून समाजात शांतता प्रस्थापित केली होती. नेहरू, इंदिरा गांधी यांच्या घराण्याशी दत्त यांचा पूर्वीपासूूनच घनिष्ठ संबंध होता. प्रिया दत्त यांना त्यांच्या कारकिर्दीचा फायदा झाला.

दत्त मृत्यूनंतर 2005 मध्ये झालेल्या पोटनिवडणूकीत आणि त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत प्रिया दत्त निवडून आल्या. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांमधील सहभाग कमी केल्याचे समजते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

प्रिया दत्त यांच्या आई नर्गीस या इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त झाल्या होत्या. प्रिया दत्त यांना मोठा राजकीय वारसा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्या अलिप्त राहिल्या. प्रिया दत्त यांनीही त्याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. आगामी निवडणूक लढविणार नसल्याने आता सर्वसमावेशक आणि लोकप्रिय असलेला उमेदवार देण्यासाठी कॉंग्रसने गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू केल्या आहेत. या शोधमोहिमेत चित्रपट अभिनेते राज बब्बर आणि क्रिकेटपटू मोहम्मद्दीन अझरूद्दीन यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र अभिनेत्री नगमा यांचे नाव आघाडीवर आहे. मोदी लाटेवर पूनम महाजन यांनी गेल्या 2014 मध्ये या मतदार संघात कॉंग्रेसवर मात केली. आता कोणतीही लाट नाही. त्यामुळे कॉंग्रेसशी भाजपच्या पूनम यांचा थेट सामना होईल. 

नगमा प्रमुख दावेदार 
अभिनेत्री नगमा या मतदार संघातून कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा या मतदारसंघात आहे. मात्र अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा त्यांच्याविषयी अपप्रचार झाल्यास कॉंग्रेससाठी ते अडचणीचे ठरेल अशी चर्चा कॉंग्रेसच्या वर्तूळात आहे. त्यामुळे नगमा यांच्या उमेदवारीविषयी कॉंग्रेसमध्ये खलबते सुरू असल्याचे समजते. मात्र नगमा याच या मतदारसंघात कॉंग्रेसच्या प्रबळ दावेदार असल्याचे समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com