prithvirajababa supporter corporetor | Sarkarnama

पृथ्वीराजबाबा समर्थक नगरसेवकांची भाजपशी जवळीक ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 जुलै 2017

पृथ्वीराजबाबांना दिल्ली आणि मुंबईच्या राजकारणात महत्त्व असलेतरी कऱ्हाडात मात्र त्यांना सत्तेसाठी मोठा झगडा करावा लागतो. ते मुख्यमंत्री असताना कऱ्हाड पालिका व पंचायत समितीत कॉंग्रेसला सत्ता मिळाली नव्हती. कऱ्हाड दक्षिणमधून आमदार म्हणून निवडूण येताना त्यांना मोठी कसरत करावी लागली. काही महिन्यांपुर्वी झालेल्या कऱ्हाड पालिका निवडणुकीत त्यांना बहुमत मिळाले, मात्र नगराध्यक्ष भाजपचा निवडूण आला. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडूण आलेले सदस्य हे आता त्यांना मानत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. 

सातारा : भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले यांची नुकतीच पंढरपूर येथील विठ्ठल रूक्‍मिणी मंदीर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर श्री. भोसले हे कार्यभार स्वीकारून कऱ्हाडात आल्यावर त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांबरोबरच पृथ्वीराज चव्हाण यांच्या पॅनेलमधून निवडून आलेले नगरसेवक ही उपस्थित होते. अलिकडे या नगरसेवकांचे पृथ्वीराज बाबांशी फिस्कटले असल्याने ते न्यूट्रल वाटत असले तरी भाजपशी झालेली त्यांची जवळीक आगामी काळात वेगळ्या राजकरणाची नांदी येथे पहायला मिळण्याची शक्‍यता आहे. 

कऱ्हाड पालिका निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलचे 16 नगरसेवक निवडून आले तर भारतीय जनता पक्षाचे चार नगरसेवक आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडूण आला. त्यामुळे सभागृहात वर्चस्व असूनही नगराध्यक्षपद भाजपकडे असल्याने या सर्वांची कोंडी होत आहे. पण ही कोंडी फोडून भाजपची ताकद वाढावी म्हणून मध्यंतरी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले यांनी एक प्रयोग करून बघितला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कऱ्हाडात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम व मेळावा घेतला. पण या मेळाव्यात महाबळेश्‍वर, खंडाळ्यासह इतर नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. मुळात कऱ्हाडातील पृथ्वीराज चव्हाण गटातील नगरसेवक प्रवेश करतील या अंदाजाने हा कार्यक्रम घेतला होता. पण एक दोघांनी भाजप प्रवेशास नकार दिल्याने हा प्रयोग फिस्कटला. 

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून निवडून आले असलेतरी त्यांचे बाबांशी फिस्कटलेले आहे. त्यामुळे हे नगरसेवक न्युट्रल राहण्याचा प्रयत्न करत असले तरी ते भाजपच्या संपर्कात आहेत. हा संपर्क प्रवेशात रूपांतरीत होऊ शकलेला नाही. मागील काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आईवडीलांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमालाही त्यांच्याच गटाचे नगरसेवक उपस्थित नव्हते. पण मुख्यमंत्र्यांनी अतुल भोसलेंना ताकद देण्यासाठी त्यांची पंढरपूर येथील विठ्ठल रूक्‍मिणी मंदीर समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली. या निवडीनंतर अतुल भोसले आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारून पंढरपूरहून कराडात आले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या नगरसेवक व नगराध्यक्षांसह पृथ्वीराज बाबांच्या गटाचे नगरसेवकही उपस्थित होते. एका बाबाच्या स्वागतासाठी दुसऱ्या बाबांचे नगरसेवक गेल्याने कऱ्हाडात चर्चेचा विषय झाला. पण बाबांचे नगरसेवक न्यूट्रल राहण्याच्या नावाखाली भाजपशी सलगी साधून असल्याने आगामी काळात वेगळ्या राजकारणाची नांदी पहायला मिळण्याची शक्‍यता आहे. 

 

संबंधित लेख